'वेदांता' ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाय. पुण्याजवळ तळेगाव येथे होऊ घातलेला प्रकल्प आता गुजरातकडे गेल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप शिंदे गटाचं सरकार येताच महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल महाविकास आघाडीचे नेते सरकारला करत आहेत. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी नेटाने उत्तरं द्यायचा प्रयत्न करत आहे.
सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी महाराष्ट्राऐवजी गुजरातची निवड का केली?
अनिल अग्रवाल : हा एक व्यावसायिक निर्णय होता. त्यासाठी फॉक्सकॉनच्या व्यवस्थापन सल्लागार फर्म सोबत तज्ज्ञांची टीम स्थापन करण्यात आली होती. त्या टीमने पाच-सहा राज्यांना भेट दिली. प्रत्येक राज्याने सर्व सोईसुविधा देऊ केल्या आणि आम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी ऑफर केल्या. मला या सगळ्यांमध्ये गुजरातची निवड का केली याविषयी काही बोलायचे नाही. पण आम्हाला वेळेचे बंधन होते आणि आम्हाला वेगाने निर्णय घ्यायचे होते. टीमला मुल्यांकन सुरू ठेवण्यासाठी आणखी दोन महिने देण्याची आमची इच्छा नव्हती. आम्ही म्हणालो, तुम्ही शिफारस करा आणि तुम्ही जे ठरवाल, त्यानुसार आपण पुढे जाऊ... त्यांनी गुजरातला जाण्याची शिफारस केली.
सल्लागार कोण होते?
अनिल अग्रवाल : मला त्यांचं नाव घ्यायचे नाही.
मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी लागणारी रक्कम मोठी आहे. त्यासाठी निधी देण्याची तुमची योजना कशी आहे?
अनिल अग्रवाल : हे दोन टप्प्यात केले जाईल आणि एक टप्पा सुमारे $10 अब्ज असेल. जगात अशी एकही संस्था नाही जी त्यासाठी निधी देऊ इच्छित नाही. निधीची समस्या कधीही होणार नाही. हे असे प्रकल्प आहेत ज्यांची जग आतुरतेने वाट पाहत आहे.