जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
गेले काही दिवस सातत्याने चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात, पावसाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याने, धरणात पाण्याची आवक जास्त होत होती. परिणामी वारणा नदीच्या पात्रात, चांदोली धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या परिस्थितीत चांदोली धरण परिसरात, पावसाचे प्रमाण कमी झाल्याने, धरणात होणारी पाण्याची आवक ही परिणामी कमी झाली आहे. त्यामुळे आज गुरुवार रोजी चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे दुपारी४.०० वाजता पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. मात्र जलविद्युत केंद्राकडून होणारा १५६३ क्युसेक प्रति सेकंद विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. सध्याच्या परिस्थिती चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून धरणात सध्या ३४.१२ टी.एम.सी. पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ९९.१७अशी आहे .सध्याची चांदोली धरणाची पाण्याची पातळी ६२६.७० मीटर आहे. चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाज्यातून वारणा नदीत होणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद केल्याने, वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत घट होण्यास प्रारंभ झाला आहे . यदाकदाचित जर पुढील काळात पावसाच्या प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर, पुन्हा चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाजातून कोणत्याही क्षणी विसर्ग चालू करण्यात येईल असे शाखा अभियंता गोरख पाटील यांनी सांगितले आहे.