*सांगलीच्या जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पदी आंचल दलाल यांची नियुक्ती--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या तब्बल 109 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित झाले असून, त्यामध्ये प्रामुख्याने सांगलीच्या जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पदी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी सांगलीत पोलीस अधीक्षकपदी डॉ. बसवराज तेली यांनी कार्यभार स्वीकारला होता. सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली हे सुद्धा भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. त्यामुळे दोन्हीही महत्त्वाच्या पदावर प्रथमच आय.पी.एस. अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. यापूर्वी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पदी मनीषा दुबले या कार्यरत होत्या. त्यांची सुद्धा कामगिरी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोलाची ठरली आहे. सांगली जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षपदी नियुक्ती झालेल्या आंचल दलाल ह्या पूर्वी, सातारा पोलीस उपअधीक्षक पदावर काम करीत होत्या. यापूर्वी त्यांनी साताऱ्यात पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत असताना, अवैध धंद्यासह गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी व निर्मूलनासाठी विविध उपाय योजना राबवून उल्लेखनीय कामगिरी केली होती. सांगली जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आंचल दलाल ह्या लवकरच पदाचा पदभार स्वीकारतील.