*पुणे महानगरपालिकेचे विभाजन करून उरळी देवाची व फुरसुंगी ही दोन गावे स्वतंत्र नगरपालिका म्हणून करण्याचा निर्णय --*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यातील मोठी महापालिका असलेल्या, पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून, उरुळी देवाची व फुरसुंगी ही दोन गावे वगळून, त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, मंगळवारी याबाबतीत एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. पुढील या संदर्भातील आदेश पंधरा दिवसात निर्गमित करण्यात येणार आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत, उरळी देवाची व फुरसुंगी या दोन गावासह सुमारे नऊ गावाचा समावेश करण्यात आला होता. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उरळी देवाची व फुरसुंगी समावेश झाल्यानंतर ,गेली पाच वर्षे येथील विकास कामांना चालना मिळाली होती ,त्याचप्रमाणे मिळकत कर देखील वसूल करण्यास सुरुवात झाली होती ,परंतु उरळी देवाची व फुरसुंगी या दोन गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुणे महानगरपालिकेने तेथे कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नसून, मोठ्या प्रमाणात कर मात्र वसूल केला जात असल्याने प्रचंड तीव्र रोष निर्माण झाला होता. याबाबतीत वारंवार बैठका देखील झाल्या होत्या. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उरळी देवाची व फुरसुंगी या दोन स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची मागणी देखील यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. वरील मुद्द्यांना अनुसरून मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत, दोन्हीही गावांसाठी म्हणजेच उरळी देवाची व फुरसुंगी साठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे ,नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिकेचे उपायुक्त अजित देशमुख आदी मान्यवर व दोन्ही गावांमधील नागरिक उपस्थित होते. गेली पाच वर्षे पुणे महानगरपालिकेतर्फे 225 कोटी रुपयांच्या विविध योजना राबवण्यात आल्या असून सुद्धा, विकास कामे होत नसल्याची भावना ग्रामस्थांच्या वतीने होत होती.