*सांगली- शहीद, हुतात्मा ,शूरवीर तुकाराम आंबोळे यांच्या पश्चात देखील त्यांच्या कुटुंबाकडूनहि अभिमानास्पद प्रेरणादायी कार्य चालू--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
देशाने शहीद, हुतात्मा, शूरवीर तुकाराम आंबोळे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना विसरून चालणार नाही हे अभिमानाने म्हणावे लागेल. वरील फोटोतील कुटुंब हे शूर वीर तुकाराम ओंबळे यांचे कुटुंब आहे. शूरवीर तुकाराम आंबोळे यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानानंतरही त्यांचे कार्य, त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ,यापुढे देशाला गौरव व प्रेरणा उत्पन्न होईल असे कार्य करत आहे याचा अभिमान वाटत आहे. सध्याच्या युगात बघितले तर, सर्व गोष्टी प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य करत आहे. ज्या पोलीसाने स्वतःच्या जीवाचा विचार न करता नराधम कसाबची बंदूक पकडून, स्वतःचा प्राण गमावला, ज्यामुळे हा एकमेव दहशतवादी कसाब जिवंत हाती आला, त्या हुतात्मा तुकाराम ओंबळ्यांच्या कन्येस वैशाली ओंबळेस, सर जमशेदजी जिजीभॉय पार्सी बेनोव्हेलंट इन्स्टीट्यूशनने त्यांच्या वार्षिक दिनाला बोलावले होते आणि तेथील विद्यार्थ्यांनी गोळा केलेला तीन लाखाचा धनादेश तिला देऊ केला. मात्र तो स्विकारण्याच्या ऐवजी तिने नम्रपणे सांगितले की, आईने सांगून पाठवले आहे की- वडीलांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी असे पैसे घ्यायचे नाहीत. त्यांना लहान मुले आवडायची, तेंव्हा याचा उपयोग येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी करावा. ट्रस्टचे सेक्रेटरी महरूख खरस यांनी सांगितले की हे ऐकत असताना, अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. उपस्थित मुलांच्या व पालकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. मुलांना "देण्या"ची सवय लागण्यासाठी असे प्रकल्प आम्ही करतो असे सांगून, आज वैशालीने आपणहून तेच करून, एक सक्रीय आदर्श त्यांच्या समोर ठेवला.
सोलापूरच्या रयत शिक्षण संस्थेने पण अशीच देणगी देऊ केली असता, त्यात स्वतःच्या पैशाने भर घालून ती देणगी ओंबळे कुटूंबियांनी त्याच शाळेस दिली.
तात्पर्य:- हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि त्यांची वैशाली, तसेच वैशालीची आई यांनी दाखवलेली वृत्ती आणि कृती हे एक प्रकाशात आलेले उदाहरण आहे. प्रकाशात येण्याचे कारणही तसाच प्रसंग पाठीशी असणे आहे. वरकरणी कुठलाही देश/समाज हा जरी त्यातील शासक, राजकारणी आणि उद्योगांवर "चालत" असला तरी त्याचे "टिकणे" हे आपत्काल असो अथवा नसो, स्वतःच्या परीघाबाहेर बघणार्या वृत्ती, कृती आणि त्यातून घडणार्या संस्कृतीवर अवलंबून असते असे वाटते. त्यात माझा-तुमचा पण हातभार लागत राहो हीच यातून मिळालेली अभिमानास्पद प्रेरणा होय .
खरं तर नतमस्तक होऊन अखेर असंच म्हणावं लागेल.
हुतात्मा ओंबळे आणि त्यांच्या परिवाराला सादर प्रणाम!