"तेजल"चे चमकदार यश...!
- 'सीए' परीक्षेत कोल्हापूर विभागातून पाचवी तर या परीक्षेत उत्तीर्ण होणारी व्हनाळी गावातील पहिलीच विद्यार्थिनी ठरली.
- अभ्यासात सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर तेजलने
खेचून आणले यश....!
कोल्हापूर / व्हनाळी : (जनप्रतिसाद न्यूज - विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
"तेजल"ने मिळवले चमकदार यश. निमित्त आहे सीए परीक्षेचे.
अभ्यासात सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर (मु.पो.व्हनाळी ता. कागल) येथील कु.तेजल शामराव बल्लाळ ही 'सीए' परीक्षेत कोल्हापूर विभागातून पाचवा क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सीए परीक्षेत पास होणारी ती व्हनाळी गावातील पहिलीच विद्यार्थिनी ठरली.
गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील गावातील नागरिकांतून तिने मिळवलेल्या यशस्वी कामगिरीचे कौतुक होत आहे.
तेजलचे वडील शामराव बल्लाळ हे साखर कारखान्यात उच्च पदावर असून गावातील सदन शेतकरी आहेत. त्यांनी वेळोवेळी अभ्यास करण्यासाठी आपली मुलगी तेजल हिला प्रोत्साहन दिले .
परीक्षा उत्तीर्ण होऊन सीए झाल्याबद्दल तसेच चमकदार कामगिरीने गावाचा नावलौकिक विभागीय पातळीवर वाढवल्याबद्दल कु.तेजल शामराव बल्लाळ हिचा पंचायत समिती कागलच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख सौ.सुनिता किणेकर, मुख्याध्यापक -बबन चौगुले, कु.तेजलचे वर्गशिक्षक प्रकाश मगदुम, पुष्पा पाटील,आई राजश्री बल्लाळ, शिक्षक वृंद, व्हनाळी आदी उपस्थित होते.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस् ऑफ इंडिया'यांच्या वतीने नोव्हेंबर २०२२मध्ये झालेल्या 'सीए'परीक्षेत कोल्हापूर विभागातून पाचवा क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन केले.
यावेळी बोलताना तिचे शिक्षक बाळकृष्ण चौगले यांनी कु.तेजलच्या प्राथमिक शाळेपासून ते सीए होण्यापर्यंतचा जिद्दीचा, ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमाचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला.'चार्टर्ड अकौंटट' हा कोर्स देश पातळीवर मान्यता असलेला असलेने त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मार्ग खडतरच आहे. मात्र, यावर्षी कोल्हापूरमधून या परीक्षेसाठी बसलेल्या ३०७ विद्यार्थ्यांमधून ५१ विद्यार्थी सीए उत्तीर्ण होवून आतापर्यंतच्या सर्वाधिक निकालात कोल्हापूरकरही अव्वल
ठरले. यावेळी प्रकाश मगदुम यांनी जिल्हा परिषद शाळेतील मुले गुणवत्तेत अव्वल स्थानावर असल्याचे कु.तेजलच्या निकालाने सिध्द झाल्याचे सांगितले. व
व्हनाळी गावात पहिली सीए होण्याचा बहुमान पटकावलेबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी कु.तेजलने आपल्या यशामध्ये प्राथमिक शाळेत हस्ताक्षरापासून ते गणिताची आवड, स्पर्धा परीक्षेचे बाळकडू दिलेले शिक्षक प्रकाश मगदुम सर,पुष्पा पाटील मॅडम, सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाचा बहुमोल वाटा असल्याचे सांगितले. कठोर परिश्रमानेच यशाचा मार्ग सुकर होतो आणि ध्येय साध्य होते, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. बबन चौगुले सर यांनी आभार मानले.