प्रतिनिधी : मिलिंद पाटील
जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्ट ही सेवाभावी संस्थेतर्फे गेली २२ वर्षे सातत्याने जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरामध्ये मोफत अन्नछत्र सेवा देते. यावर्षी देखील २ ते ६ एप्रिल या कालावधीमध्ये दिवस -रात्र सुरू राहणार आहे. मागील वर्षी झालेली गर्दी लक्षात घेवून यावर्षी दोन लाखांवर यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील, या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. अशी माहिती सन्मती मिरजे, चिंतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाहनाने येणारे यात्रेकरू मुख्य रस्त्याने गायमुखावर येतात. त्यांच्या वाहनांसाठी गायमुख परिसरामध्ये वाहनतळ तयार करण्यात आला आहे. येथे लाईटची व्यवस्थाही करण्यात आली आहे. विविध ठिकाणांहून येणारे यात्रेकरू रात्री अपरात्री डोंगरावर पोहोचत असतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, या हेतूने त्यांच्या सोयीकरिता ‘सहजसेवा’च्या वतीने २४ तास अन्नछत्र सुरू ठेवण्यात येणार आहे. अन्नछत्रामध्ये यात्रेकरूंना जेवणासाठी १५ हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर चहा व मठ्ठ्याकरिता वेगळे मंडप उभारण्यात आले आहेत. दरम्यान, महात्मा गांधी हॉस्पिटल, पारगाव यांच्या सहकार्याने गायमुख परिसरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘यात्रेकरूंनी सहज सेवा ट्रस्टच्या या अन्नछत्राचा लाभ घ्यावा. तसेच दानशूर व्यक्तींनी, संस्थांनी या उपक्रमास मदत करावी, असे आवाहन शहा यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेला मनीष पटेल, चेतन परमार, रोहित गायकवाड, प्रमोद पाटील उपस्थित होते.