जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
आज मध्यरात्री सुमारे 2:00 वाजता, पुणे- बेंगलोर महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव परिसराच्याजवळ असणाऱ्या, स्वामीनारायण मंदिराजवळ, ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात होऊन, 4 जणांचा मृत्यू व 22 जण जखमी झाले आहेत. 22 जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून, नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. खाजगी बस क्रमांक एम एच 03 सी पी 4409 नीता ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला, पाठीमागून एका ट्रकने जोरदार धडक दिली. नीता ट्रॅव्हल्स कंपनीची बस ही कोल्हापूरहून- डोंबिवली या गावाकडे जाण्यासाठी प्रवास करत होती. पुणे- बेंगलोर महामार्गावर नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामीनारायण मंदिराजवळ, पहाटे 2:00च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. त्यावेळी बस मधील सर्वच प्रवासी गाढ झोपेत होते. त्यामुळे 4 प्रवाश्यांचा जागीच मृत्यू होऊन ,22 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 4 जखमींची प्रकृती गंभीर आहे .सर्व जखमी प्रवासी, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून, मृत व जखमींच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून, या अपघातात ट्रकचालक सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. नीता ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला पाठीमागून धडक दिलेला ट्रक हा, मालवाहतूक करणारा मोठा ट्रक क्रमांक एम एच 10 सी आर 1224 असून ,साखर पोती वाहतूक करणारा आहे. सदरहू अपघाताची माहिती मिळताच, पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, 1 रेस्क्यू व्हॅन, पीएमआरडीए कडून 1 रेस्क्यू व्हॅन अशी वाहने अपघातस्थळी पोहोचली. नीता ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसच्या पाठीमागील बाजू कडून काचा फोडून, बचाव पथकातील लोकांनी, जखमी प्रवाश्या्ंना बाहेर काढले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ,तातडीने मध्यरात्री नरे आंबेगाव येथे झालेल्या अपघात स्थळी भेट देऊन, पाहणी करून योग्य ती निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नीता ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला पाठीमागून धडक दिलेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.