जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
नागपुरात आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी (ता. 3 मे ) दुपारी 1:00 वाजता जाहीर होत असून, राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास 1200 जणांची टीम होणार आहे असे सांगितले.
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले, दर तीन वर्षांनी प्रदेश कार्यकारिणीची नव्याने रचना होत असते. जुन्या कार्यकारिणीला आता साडेतीन वर्षांचा कालावधी झालेला आहे. 12 ऑगस्ट 2022 ला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी अपेक्षित होती. या कार्यकारिणीच्या माध्यमातून 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. 48 लोकसभा आणि 200 हून अधिक विधानसभा युतीत जिंकण्याचा आमचा पण आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही एकत्रित हा प्रयत्न करू, त्यामध्ये चांगले यश आम्हाला प्राप्त होईल.
• 288 विधानसभा समन्वयक
288 विधानसभा समन्वयक देखील लवकरच जाहीर करणार. नव्या जिल्हाध्यक्षांची टीम सुद्धा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सज्ज होईल. साधारणत: मे महिन्याच्या अखेरपर्यंत संघटनात्मक बदल पूर्ण करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे.
• अमृतकुंभ अभियान
जुने नवे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही काम करत आहोत. जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीच्या निर्माणापर्यंत 60-65 वर्षे वयाचे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या नेतृत्वाचाही आदर करून त्यांना नानासाहेब तथा उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियानातून सहभागी करून घेत आहोत.
• उद्धव ठाकरे नौटंकीबाज !
ठाकरे नावाची नाटक कंपनी आहे. जे उद्धव ठाकरे बारसूच्या बाजूने होते ते उद्धव ठाकरे आता नौटंकी करायला चाललेत. खरंतर त्यांना तो अधिकार आहे का? तो अधिकार स्थानिकांचा आहे, अधिकार त्या प्रकल्पग्रस्तांचा आहे, याबाबत सरकार निर्णय घेईल. उद्धव ठाकरे यापूर्वी बारसूत प्रकल्प होण्याच्या बाजूने होते आणि शिल्लक सेना किंचित होत चालली आहे, ती शून्य होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू आहे. मुंबईतील वज्रमूठ सभेबद्दल बोलायचे तर निराश, चिंताग्रस्त, शिल्लक सेना किंचित होत चालली म्हणून निराश झालेले उद्धव ठाकरे बोलत मात्र आवेशाने आहेत. या त्यांच्या आवेशाबद्दल त्यांनी स्वतःच पहावे की ते समाजमाध्यमांवर किती ट्रोल होत आहेत.
• बाजार समितीत भाजपा क्र.-1
ते काल बाजार समितीबद्दल बोलले. त्यांनी आकडे बघावेत, सहाव्या नंबरवर आहात. तुमच्यापेक्षा प्रकाश आंबेडकर पुढे आहेत. त्यामुळे काही बोलू नका. भाजपाने या निवडणुकीत पहिल्यांदाच एन्ट्री मारली आहे. सहकार क्षेत्रामध्ये तुमच्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आजवर ताबा होता. ते आले यात काही नवल नाही. खरे तर आमचेच अभिनंदन झाले पाहिजे. कारण पहिल्यांदाच उतरलो आहोत तरी एक नंबरवर आलो आहोत.
• तुम्हीच भुईसपाट व्हाल--
अमितभाईंना भुईसपाट करण्याची भाषा ठाकरे यांनी केली. यावर श्री. बावनकुळे म्हणाले, मला वाटते स्वत: ठाकरे केव्हा भुईसपाट होतील ते कळणार नाही. तसेही भुईसपाट झालेच आहात, किंचित बाकी उरला आहात. तुम्हाला रोज तुमचे लोक सोडून जाताहेत, रोज पक्षप्रवेश होत आहेत. तुमच्याकडे राहायला कुणी तयार नाहीत, पण बोलणं मात्र असं आवेशात आहे. अमितभाईंवर टीका करण्याची तुमची लायकी नाही. कुठे सूर्य आणि कुठे दिवा! कशाला हसे करून घेता? जरा तुम्ही काय ट्रोल होता आहात आणि तुमचेच स्टेजवरचे नेते तुमच्याबद्दल काय बोलताय त्याची माहिती करून घ्या.
• नितेश राणेंच्या विरुद्ध लढा
उद्धवजी तीन वर्षापासून तुमचा तो भोंगा लागलाय तो चालतो तुम्हाला, आणि आमचे लोक बोलायला लागल्यानंतर तुम्हाला लागतं? आजवर झोपले होते का? तुम्ही तुमचा तीन वर्षापासून चालू असलेला भोंगा का बंद केला नाही? आता मुख्य विशेष प्रवक्ते असलेले नितेश राणे संजय राऊतना त्यांच्याच भाषेत उत्तर देतात तर तुम्ही त्यांचा अपमानकारक उल्लेख करता? मला माहित आहे नितेश राणेंमध्ये किती क्षमता आहे ती! संजय राऊतना म्हणावे नितेश राणेंच्या विरुद्ध सिंधुदुर्गात जाऊन निवडणूक लढवून दाखवा मग समजेल!
कोट
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकांनी काम केले. बाळासाहेबांची प्रेरणा तर सर्वांनाच आहे. पण उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व काय? कधी लोकांमधून आमदार, खासदार झालेत विधान परिषदेत बॅकडोअरने एंट्री हेच कर्तृत्व! २०२४ मध्ये रणांगणात उतरा, विधानसभा लोकसभा लढा, मग बघू! उद्धव ठाकरेंना चारी मुंड्या चीत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे आमचे आव्हान आहे.