जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मिडीयाव्दारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवले जात आहेत. त्यावरुन एक जमाव करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने व मोठया प्रमाणात यात्रा, उरुस साजरे होणार असल्याने या दरम्यान एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून जातीय तेढ निर्माण होवू नये, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.
कलम 37 (1) अ ते फ :-
अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. (ब) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. (क) दगड किंवा इतर क्षेत्रणात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. (ड) व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन. (इ) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. (फ) ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.
कलम 37 (3) :-
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे.
हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.