जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
देशात जवळपास अस्तित्वात असलेल्या 2000 रुपये मूल्यांच्या नोटा 88% परत आल्याची माहिती, रिझर्व बँकेने आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. काल अखेर जमा झालेल्या नोटांचे मूल्य 3 लाख 14 हजार कोटी रुपये इतके असून, अजूनही 42 हजार कोटी रुपये मूल्यांच्या 2000 रुपयांच्या नोटा, बाजारात अस्तित्वात असल्याचे पुढे पत्रकात म्हटले आहे. यंदाच्या वर्षी 19 मे रोजी रिझर्व बँकेने, 2000 रुपयांच्या चलनात अस्तित्वात असलेल्या नोटा परत घेण्याची घोषणा केल्यानंतर, आज जवळपास 88 टक्के नोटा रिझर्व बॅंकेकडे परत आल्याचे पत्रकात नमूद केले आहे. त्याबरोबरच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने येत्या 2 महिन्यात 2000 रुपयांच्या चलनात असलेल्या नोटा बँकेकडे जमा करून ठेवीच्या रूपाने अगर पैशाच्या स्वरूपात बदलून द्याव्यात असे आवाहन केले आहे.रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आवाहनानुसार 2000 रुपयांच्या चलनात असलेल्या नोटा, देशातील बँकेतून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बदलून घ्याव्या असे पूर्वीच्या आदेशात म्हटले होते.