जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापूर येथील श्री.क्षेत्र जोतिबा येथे श्रावण मासातील तिसर्या सोमवारी मोठ्या संख्येने असलेल्या भाविकांच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. ही प्रदक्षिणा केल्यास १२ जोर्तिलिंगांची यात्रा केल्याचे पुण्य लाभते,अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदक्षिणेचा २५ किलोमीटरचा प्रवास भाविक पायात चप्पल न घालता करतात, तसेच प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत भाविक खाली बसत नाहीत. सायंकाळी प्रदक्षिणा यमाजी मंदिर येथे आल्यानंतर आरती होते आणि सुंठवडा वाटपानंतर प्रदक्षिणेची सांगता होते. पारंपारिक प्रथेनुसार दरवर्षी श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगराची प्रदक्षिणा भक्त भाविकांच्या कडून केली जाते. महाराष्ट्रातील असंख्य लोकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा डोंगराच्या नगर प्रदक्षिणेला भक्त भाविक फार मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी होणाऱ्या श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर नगर प्रदक्षिणेमध्ये,भक्त -भाविक "ज्योतिबाच्या नावानं चांगभलं"असा गजर करीत, ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करत असतात.यंदाच्या वर्षी ४ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता मुख्य मंदिरातून नगर प्रदक्षिणा सोहळ्यास प्रारंभ झाला.प्रदक्षिणेच्या मध्यभागी वीणा आणि डमरू होते. त्यांच्या समवेत भगवे ध्वज घेतलेले पुजारी आणि भाविक होते. धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर मंदिराच्या दक्षिण द्वारातून प्रदक्षिणा बाहेर पडून गायमुखाकडे मार्गस्थ झाली. प्रदक्षिणेच्या मार्गावर भाविकांसाठी विविध संस्था,भाविक, भक्त यांनी राजगिरा लाडू,खिचडी,पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.