जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जर कोयना धरणातून पाणी सोडण्यास अडथळे आणले गेले तर,वेळप्रसंगी खासदारकीचा राजीनामा देण्यास बघणार नसल्याचे प्रतिपादन सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी केले आहे.आज सांगलीतील सर्किट हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सांगली जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीत जनतेला पाणी देण्यात अडथळे आणल्यावरून,खासदार संजय काका पाटील यांनी कोयना धरण कोणाच्या मालकीचे आहे का?असा संतप्त सवाल केला.सांगली जिल्ह्याच्या आत्मसन्मानाला कोणत्याही प्रकारची बाधा आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.कोयना धरणातील पाण्यावर दुष्काळी जिल्ह्यातील जनतेचा हक्क असून,पाणी हे हक्काचे आहे.कोणीही दान किंवा भीक देत नसून,वेळप्रसंगी टोकाची भूमिका घेण्यात येणार असल्याचा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी दिला.
सध्याच्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत देखील राजकारण करण्याच्या भूमिकेचा निषेध करून,गणेशोत्सवात देखील नदी कोरडी पडली होती या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला.महाराष्ट्र राज्यातील मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी यात कोणताही हस्तक्षेप करू नये, शिवाय कोयना धरणातून पाणी सोडण्याचे अधिकार पाटबंधारे मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.सांगली जिल्ह्यातील जनता दुष्काळाचा सामना करत असताना,जिल्ह्याला वेठीस धरण्याचे काम काही जण करीत असल्याचा आरोप करीत अशा प्रकारचे राजकारण करणाऱ्या भूमिकेचा त्यांनी निषेध केला.यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील पाऊस फार कमी झाल्याने, जिल्ह्यातील जनता दुष्काळाचा सामना करीत असल्याचे त्यांनी सांगितले.