जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ.बी.सी.प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिलेला इशारा तसेच जिल्ह्यात मोठया प्रमाणात यात्रा,उरुस,सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण,मोर्चा इ.प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे.
हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी,कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य,अधिकार बजाविण्याच्या संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक,कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे,अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण,उत्सव,जयंती,यात्रा,इ.हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न,इतर धार्मिक समारंभ,सण,यात्रा,प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.