जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीस गणेशोत्सवाच्या काळात महानगरपालिकेकडून शहरातील स्वच्छतेसाठी जवळपास १२०० कर्मचा-यांची दोन सत्रात नियुक्ती करण्यात आली आहे असे महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले. यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सव पर्यावरण पूर्वक नियोजनात साजरा होण्यासाठी सांगली मिरज व कुपवाड महापालिकेने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता करणे, निर्माल्य गोळा करणे, मूर्तिदान स्वीकारणे, शहरातील साठलेल्या कचऱ्यांचा तत्काल उठाव करणे आदी कार्यांसाठी सदरहू १२०० कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. यात अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, २१ मुकादम आणि १०४७ स्वच्छता कर्मचारी कार्यान्वित राहणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सव काळात स्वच्छतेवर अधिकाधिक प्राधान्य दिले असून पर्यावरण पूर्वक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी शहरातील नागरिकांनी मूर्ती दान करून निर्माल्य कचराकुंडीत टाकून सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.