- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बनली दुरावस्था
- पाणी निचरा होण्याची "वाट" नसल्याने उद्यानाच्या मधोमध तळ्याचे स्वरूप
कोल्हापूर : जनप्रतिसाद् न्यूज (विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह कोल्हापुरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत बनले आहे. तर रस्त्यांची दुरावस्था बनली आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने पादचारी, दुचाकी वाहन धारकांना वाहन चालवणे कसरतीचे बनले आहे. त्याचप्रमाणे "महावीर गार्डन" या शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या उद्यानामध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने "तळ्याचे स्वरूप" निर्माण झाले आहे. तसेच उद्यानातील रिकाम्या परिसरामध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने प्रचंड दुरवस्था निर्माण झाली आहे. याकडे मनपा प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले असून दुरावस्था थांबवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याच्या तीव्र भावना सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे.
उद्यानामध्ये निर्माण झाले तळे..!
पाण्याच्या निसरा होण्यास अडथळा निर्माण झाल्याने उद्यानाच्या मधोमध पाणी साचून राहिले आहे. यामुळे या परिसराला तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. पाणी साचून राहिल्याने डासाचे साम्राज्य आहे. डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरात लवकर साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. सध्या डेंग्यूच्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. साचून राहिलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात झाल्यास परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण होणार आहे. मनपा आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारावर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
फिरायला येणाऱ्या आबालवृद्धांची संख्या घटली
जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शाहूपरी, लक्ष्मीपुरी आदी परिसरातील आबालविरुद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात महावीर उद्यानातील ट्रॅकवर फिरण्यासाठी येतात. तसेच ओपन जिमवर व्यायामासाठी युवा वर्ग येतो. त्याचबरोबर लहान मुलांबरोबर फॅमिलीही उद्यानात येतात. मात्र, उद्यान परिसरातील रिकाम्या मैदानावरील गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने या परिसराची दुरावस्था झाली आहे. यामुळे उद्यानात येणाऱ्या अबालवृद्धांची संख्या घटली आहे.
उद्यानातील खेळाच्या साहित्याची दुरावस्था
लहान मुलांसाठी उद्यानात विविध खेळाचे साहित्य बसविण्यात आले आहे. या साहित्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. याकडे वेळीच लक्ष नाही दिले, तर यावर करण्यात आलेला खर्च वाया जाणार आहे. ही दुरावस्था थांबवण्यासाठी मनपा उद्यान विभागाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी सर्वसामान्यातून जोर धरली आहे.
खाद्यपदार्थांच्या विक्रीवर परिणाम
उद्यानाच्या परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गाड्या आहेत. उद्यानात येणाऱ्या नागरिकांची संख्या घटल्याने खाद्य पदार्थ विक्री व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे.