(अनिल जोशी)
सांगलीमध्ये, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणारा असाल, तर आम्हाला पण नोकऱ्या द्या, सर्वांनाच पेन्शन द्या, या मागणीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यावर कार्यालयावर मोर्चा काढण्याच्यासाठी, रविवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 11:00 वाजता वृत्तपत्र विक्रेता भवन, त्रिकोणी बागेजवळ, सांगली या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती सर्वपक्षीय कृती समितीचे प्रमुख सतीश साखळकर यांनी दिली.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, लोकांना व विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार या वर चर्चा करून, जुनी पेन्शन देणार असाल तर बेरोजगार तरुणांना नोकऱ्या द्या, सर्वसामान्य शेतकरी व संघटित कामगारांच्या मागण्या मान्य करा, सर्वच घटकांना पेन्शन द्या आदी मागण्यासाठी, सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीचे प्रमुख सतीश साखळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे भालचंद्र मोकाशी, महावीर पाटील, हेमंत मोरे, पदाधिकारी बेरोजगार संघटनेचे दीपक चव्हाण, यांच्यासह विकास सूर्यवंशी, अमृत माने- सावर्डेकर, भरत कुंभार, सुरज देसाई,आनंद देसाई, प्रवीण पाटील व अधिक पोतदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सत्तेच्या व संघटनाच्या जोरावर कोणीही काही निर्णय घ्यावेत व ते सामान्य, सर्वसामान्य जनतेने शेतकऱ्यांनी, कष्टकरी, व्यवसायिक उद्योजक, व्यापारी यांनी कितीही अन्याय झाला तरी तो सहन करावा हे आता कुठेतरी थांबले पाहिजे. चुकीच्या गोष्टींना चुकीचं म्हणत जोपर्यंत विरोध केला जाणार नाही, तोपर्यंत चुकीचे प्रकार थांबणार नाहीत.
सोशल मीडियावर, वैयक्तिक चर्चेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपाबाबत चर्चा करणाऱ्या, विरोध करणाऱ्या लोकांनी तरुण युवक-युवतींनी मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे.
या सध्या कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरील वेतन व पेन्शन यावरील खर्च नियंत्रित राहिला, तरच भविष्यात नव्याने नोकर भरती होईल. सरकार नोकर भरती करेल. अन्यथा आहे त्याच लोकांचा भार पेलवत नाही, या कारणाने भविष्यात सरकारी नोकर भरती होणार नाही. संकट टाळण्यासाठी बेरोजगार तरुण-तरुणी, शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी यांनी मोर्चाच्या या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.