जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
सांगलीच्या वसंतदादा शेतकरी बँकेने पूर्वी कर्नाटकात तीन कोटीचे कर्ज वाटप केले होते .या नियमबाह्य दिलेल्या सुमारे तीन कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली करून ,गेले वर्षभरात इतर थकीत असलेल्या कर्जाची एकूण 20 कोटी रुपयांपर्यंतची वसुली चालू आर्थिक वर्षात केली असल्याची माहिती बँकेच्या अवसायक व महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे. वसंतदादा शेतकरी बँकेच्या इतर शहरातील बँकेची स्थावर 37 कोटींची मालमत्ता विक्री करून, ठेवीदारांनी ठेवीत गुंतवलेले पैसे नियमानुसार परत देण्यात येतील असे बँकेच्या अवसायक स्मृती पाटील यांनी सांगितले आहे. नुकताच त्यांनी अवसायक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जवळपास कर्नाटक राज्यातील थकीत तीन कोटी कर्जासहित, थकीत असलेल्या एकूण वीस कोटी रुपयांच्या कर्जाची चालू आर्थिक वर्षात वसुली केली आहे. पुढील वर्षी मुंबई, पुणे, ठाणे यासह अन्यत्र शहरात असलेल्या वसंतदादा शेतकरी बँकेच्या इतर 37 कोटींच्या मालमत्तेची विक्री व तारण असलेल्या कर्जांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे.
वसंतदादा शेतकरी बँकेच्या सांगलीतील मुख्य इमारतीचा लिलाव नुकताच झाला आहे. वसंतदादा शेतकरी बँकेची एकूण ग्राहकांची देणी ही जवळपास 153 कोटींच्या आसपास आहे व वसंतदादा शेतकरी बँकेची थकीत कर्ज येणे बाकी 156 कोटी रुपये असून, त्यातील तारणी कर्ज 35 कोटी रुपये आहे. सहकारी कायद्यान्वये थकीत कर्जदारांच्या बाबतीत वसुलीचा प्रयत्न चालू असून ,याबाबतीत कर्जदारांच्या मालमत्तेची जप्ती व लिलावाच्या कारवाईची प्रक्रिया चालू असल्याची माहिती बँकेच्या अवसायक व महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे. कर्नाटक राज्यातील नुकतीच नियमबाह्य थकीत कर्ज वसुली केलेल्या मध्ये अथणी शुगर चा समावेश असल्याची माहिती आहे. अनेक कर्जदारांच्या बाबतीत सद्य परिस्थिती वसुलीचे दावे, हुकूमनाम्यासाठी प्रलंबित आहेत. बँकेच्या अवसायक व उपायुक्त स्मृती पाटील यापूर्वी लातूर येथे विविध बँकेच्या वर प्रशासक व अवसायिक म्हणून काम केले आहे.