*भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची, विरोधीपक्षीयांची पत्र लिहून तक्रार--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचेकडे ९ विरोधीपक्षीयांनी, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार एक पत्र लिहून केली आहे. सद्यपरिस्थितीत केंद्रीय तपास यंत्रणेचा ज्या पद्धतीने वापर चालू आहे ,त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळत असून, त्यांच्या स्वायत्ततेविषयी व निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .सन 2014 पासून या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर होत आहे. भारतातील काही राज्यांमध्ये, सद्याच्या परिस्थितीत राज्यपालांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असून, राज्यपाल, राज्यांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनात दरी पडत असल्याचे नमूद केले आहे .राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ विरोधी पक्षीयानी सदरहू पत्र पाठवले आहे. यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ,तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदसचे नेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कोणत्याही तपासायंत्रणेंचा गैरवापर होत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे .जे लोक गैरमार्गाने पैसे कमवून भ्रष्टाचार करत आहेत ,अशा सर्व भ्रष्टाचारांना शिक्षा देण्याचे काम या संस्था करत असून ,यामध्ये सद्यपरिस्थितीत कोणताही राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे दिसत नाही असे नमूद केले आहे.