जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
ग्रामीण भागातील लोकं आहारात ज्वारीलाच प्राधान्य देतात. त्यामुळेच त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी असतात.
दररोजच्या आहारातून जे वेगवेगळे अन्नघटक आपल्या पोटात जातात त्याद्वारे आपल्या शरीराचं पोषण होत असतं. शरीराचं पोषण करणाऱ्या या महत्त्वाच्या घटकांची माहिती आपल्याला असायला हवी. मुख्यत्वे आपल्या जेवणात चपाती, पुरी, पराठा किंवा नान यांचा समावेश असतो. पण त्यापेक्षाही जास्त सकस आणि पोषक असलेल्या ज्वारीचा मात्र आहार म्हणून फार कमी वापर केला जातो. डायट प्लॅनमध्ये तर ती नावालासुद्धा नसते. म्हणूनच शहरी भागात ज्वारीची मागणी कमी झाली आहे. पण ग्रामीण भागात राहणारे लोकं आजही मुख्य अन्न म्हणून ज्वारीलाच प्राधान्य देतात. कदाचित त्यामुळेच शहरातल्या लोकांपेक्षा ग्रामीण भागातील्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी असतात.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर गहू आणि इतर धान्यापेक्षा ज्वारी ही पचायला हलकी आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे आठवड्यातले दोन दिवस तरी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात हार्मोन्सचं प्रमाण कमी-जास्त होतं, अशा वेळेस महिलांनी आहारात ज्वारीचा समावेश करावा. आहारात ज्वारीचे पदार्थ असतील तर स्तनाचा कर्करोग होत नाही, असं संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे. उत्तम गुणधर्मामुळे ज्वारी आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरते. आहारात ज्वारीचा समावेश केल्यानंतर जाणून घ्या कोणकोणते फायदे होतात.
1 - ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना एसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आहारात ज्वारीचा समावेश करावा. ज्वारीच्या सेवनामुळे मुळव्याधीचा त्रास होत नाही.
2 - किडनीस्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीचा समावेश केल्यास, पोषक तत्त्वांमुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते. ज्वारीची भाकरीच नव्हे तर ज्वारीच्या इतर पदार्थांचाही आहारात समावेश करावा.
3 - ज्वारीमध्ये लोह तत्त्वसुद्धा मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे एनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास त्यांना फायदा होतो.
4 - फास्ट फूड आणि जंक फूड खाण्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात. आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते आणि लठ्ठपणा कमी होतो.
5 - मिनरल्स, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे प्रमुख तीन घटक ज्वारीमध्ये असल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधिचे आजार नियंत्रित राहतात.
6 - ज्वारीमुळे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. ह्रदयरोग होण्यापासून वाचायचं असेल तर ज्वारीची भाकरी तुम्ही खायलाच हवी.
7 - ज्वारीच्या सेवनामुळे मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे अशा समस्या दूर करण्यासाठा तुम्हाला आहारात ज्वारीचा समावेश करायलाच हवा.
8 - शरीरातलं इन्शुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारी अत्यंत गुणकारी ठरते. त्यामुळे मधुमेहींनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.
आपल्या देशात ज्वारीचं पीक अमाप येतं आणि त्यातलं ५० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं. आजही खेडोपाड्यात ज्वारीची भाकरी हेच लोकांचं प्रमुख अन्न आहे. जगभरातल्या प्रमुख धान्यांमध्ये गहू, तांदूळ, मका आणि बाजरीनंतर ज्वारीचा पाचवा नंबर लागतो.
मोठ्या प्रमाणावर लोह
इतर धान्यांशी तुलना केली, तर ज्वारीमध्ये खूप जास्त तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे कोठा साफ राहतो. पोट भरल्यासारखं वाटून भूक कमी लागते आणि आपोआप आहारावर नियंत्रण येतं. याचा वजनावर सकारात्मक परिणाम दिसू लागतो. तंतूमय पदार्थ जास्त असल्यानं कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.ज्वारीत मोठ्या प्रमाणावर लोहदेखील असतं. वनस्पतीमधील लोह त्यातील तंतूमय पदार्थ आणि फायटेटसमुळे शरीराला सहज मिळू शकत नाही. यावर सोपा उपाय म्हणजे हुरड्यावर लिंबू पिळणं. लिंबातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे लोह सहजपणे शरीरात शोषक लागतो.
शक्तीवर्धक
ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ते शक्तीवर्धक असतं. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याची क्षमता जास्त असते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांना ज्वारी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. ग्लायसेमिक इंडेक्स आपण पदार्थ कुठल्या स्वरुपात खातोय यावरही अवलंबून असतो. उदा. अख्खी ज्वारी खाण्यापेक्षा त्याचं पीठ मधुमेहींसाठी जास्त चांगलं! नुसती ज्वारीची भाकरी न खाता ज्वारी, नाचणी, बाजरी आणि सोयाबीन समप्रमाणात घेऊन मिश्र पिठाची भाकरी करता येऊ शकते. ज्वारीत मॅग्नेशियम, कॉपर आणि नायसिनदेखील असतं. शिवाय, ‘ब’ गटातील जीवनसत्त्वंही असतात. ही सर्व पोषक तत्त्वं आणि लोह मिळून शरीराचं चयापचय सुधारण्याचं काम कर
ग्लुटन फ्री फूड
गव्हाप्रमाणे ज्वारीत ग्लुटन नसतं. म्हणून ज्वारीला ‘ग्लुटन फ्री फूड’ म्हटलं जातं आणि ते काही प्रकारच्या विकारात फायदेशीर ठरतं. सेलियेक स्प्रू, ऑटिझम, इरिटेबल बाउल सिंड्रोम अशा विकारात ग्लुटन फ्री आहाराचा फायदा होताना दिसून येतो. यात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने त्याचा उपयोग हृदयविकार आणि कर्करोग होऊ नये म्हणूनही करता येतो.
पोषक
आरोग्यदायी खाणं महाग आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं; पण निसर्गाने आपल्याला कितीतरी स्वस्त आणि पोषक असे पदार्थ दिलेले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून महागडी फूड सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा आपल्याकडे जे मुबलक आहे त्याचा वापर करणं जास्त शहाणपणाचं आहे. त्यामुळे दररोजच्या आहारात एक वेळ ज्वारीची भाकरी अवश्य खावी. जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील असा सल्ला तज्ञ लोकही देतात आणि आजारी पडू नये म्हणून आपण दररोजच्या आहारात ज्वारीची भाकरी खावी. यासंबंधीचा लेख विविध तज्ञांची माहिती संकलित करून, जनहितार्थ प्रसारित करण्यात आला आहे.