*सांगलीतील कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी गावचे"पै.प्रकाश कोळेकर" ने निर्माण केला, तमाम मल्लाच्यापुढे आदर्शाचा "प्रकाश"-------*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
समाजात नशिबाला,गरिबीला दोष देत अनेक जण गुडघे टेकून, लाचारीचे जिणे पत्करतात,पण काही महान व्यक्तिमत्वे स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या जीवनातून धडपडतात.अश्या फार थोड्या लोकात मी आदराने नावे घेईन ते सांगली जिल्हा,कवठेमहांकाळ तालुक्यातील "आरेवाडी" गावच्या आणि आटपाडी च्या "वीर हनुमान कुस्ती केंद्र" वस्ताद "शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.नामदेव बडरे यांच्याकडे सराव करणाऱ्या पै.प्रकाश कोळेकर याचे.
नुकतेच खराडी जि. पुणे चे देशातील एक प्रमुख कुस्ती मैदान पार पडले.
हा प्रकाश कपडे काढून हसत आला आणि वस्ताद मंडळींचे दर्शन घेऊन आखाड्यात गेला.
त्याची कुस्ती होती, सेनादलाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कितीतरी वर्षे सुवर्णपदक जिंकणाऱ्या पै.सनी याच्या सोबत.वजन ,उंचीने तगडा असणारा सनी डाव,डावाच्या फैरी करत, प्रकाश ला नमवण्याचा प्रयत्न करत होता,तर त्याचा प्रत्येक डाव लीलया हाणून पाडत, क्षणोक्षणी सुटून समोर येत होता, तो पैलवान प्रकाश..!तब्बल एक तास चाललेल्या कुस्तीत,चिखलाने माखलेल्या त्या दोन मल्लापैकी कोणीही मागे हटत नव्हते,कित्येक कुस्ती अभ्यासक कुस्ती सोडवा म्हणत असतानाच,विजेच्या चपळाईने या प्रकाश ने, तब्बल 1 तास 25 मिनिटांनी पाय घिस्सा डावावर ,त्या सनी ला आसमान दाखवून, विजयाची आरोळी ठोकत मैदाना बाहेर आला दर्शनासाठी आला..!तुफानी कुस्ती झाली..मनापासून आनंद झाला.प्रकाश चा भूतकाळ खूप कष्ट व संघर्षात गेला आहे.
सांगली कवठेमहांकाळ मधील "आरेवाडी" गावचे नाव उच्चारले की "बिरोबा" देवस्थानचे नाव आपसूक तोंडात येते.याच श्रीबिरोबा च्या पंढरी आरेवाडीत, प्रकाश चा जन्म.
बारा महिने रखरखीत दुष्काळ,
घरचा मेंढपाळ व्यवसाय,
वडील दिवसभर डोंगर दर्यात मेंढरं चरायला नेऊन कुटुंबाचा घरगाडा चालवत असे.प्रकाश आणि प्रकाश चा भाऊ बापू हे दोघेही घरासाठी चार पैसे कमवावे म्हणून लहानपणी गावोगावच्या यात्रा-जत्रेच्या कुस्ती मैदानात कुस्त्या करु लागले.
खुरटलेल्या रानात कोणतेही प्रशिक्षण नसताना गुडघे ढोपर फुटेपर्यंत कुस्त्या केल्यावर, जरा कुठे उभे राहता येऊ लागले.
प्रकाश च्या जीवनात सुद्धा हेच घडले.सांगलीतल्या आटपाडी सारख्या दुष्काळी भागात एक एक लढवय्ये मल्ल पदरच्या खर्चाने उभे करुन, त्याच्यातील गुणांना खऱ्या अर्थाने वाव देणारा, एक देवमाणूसला प्रकाश सारख्या डोंगरदर्यात माती खाली लपून बसलेले हिरा शोधण्यात यश आले... *त्यांचे नाव पै.वस्ताद नामदेव बडरे.*
*महाराष्ट्र शासनाचा" शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार" प्राप्त असणारे पै.नामदेव बडरे* हे सेंट्रल रेल्वेचे पैलवान होय. "वीर हनुमान कुस्ती केंद्र " ची आटपाडी येथे स्थापना फार मोठ्या तळमळीने, कष्टाने केली होते. मनाच्या दृढ शक्तीने कुस्ती खेळणाऱ्या "प्रकाश कोळेकर" सारख्या अनेकांना "वीर हनुमान कुस्ती केंद्र" हक्काचे घर बनले.
आईसारखी माया आणि कुस्ती मध्ये बापा सारखा कठोर पणा दाखवणाऱ्या पै.नामदेव बडरे यांच्या नजरेतून प्रकाश सारखा हिरा कसा सुटेल ?प्रकाश मल्लविद्येत पारंगत होऊ लागला.पै. वस्ताद नामदेव बडरे यांनी,प्रकाश कडून दररोज सकाळी 4 तास व सायंकाळी 2 तास असे 6 तास कुस्ती मेहनत करुन घेत.प्रकाश ने राज्य,राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जिंकत सांगली चे नाव भारतात नव्हे तर साता समुद्रापार केले.त्याच्या पदकांचा तक्ता असा....
*२०१३ आशियाई स्पर्धा : उलानबटार (मंगोलिया) पाचवा*
*२०१४ : जागतिक स्पर्धा : स्लोव्हाकिया : चौथा*
*2014 युथ ऑलिम्पिक चीन*
*२०12 : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : (नालागड) हिमाचल प्रदेश *ब्रांझ पदक🥉*
*2013 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कन्याकुमारी सुवर्णपदक🥇*
*2014 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (श्रीनगर) जम्मू काश्मीर *सुवर्णपदक🥇*
*2015 जूनियर नॅशनल कुस्ती स्पर्धा (रांची) झारखंड *ब्रांझ पदक🥉*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा कुडीत्रे कोल्हापूर *सुवर्ण पदक*🥇
*राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा अहमदनगर (वाडिया पार्क मैदान) *ब्रांझ पदक*🥉
*2010 राज्यस्तरीय कुमार केसरी (भूगाव) नाशिक *ब्रांझ पदक*🥉
*सीनियर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भोसरी पुणे *ब्राझ बदक*🥉
*सीनियर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क मैदान (अहमदनगर) सुवर्ण पदक🥇*
*2015 नागपूर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुवर्ण पदक*
*2017 महाराष्ट्र केसरी स्पर्धा वारजे पुणे ब्रांझ पदक.*
*२०१३ कुमार कामगार केसरी*
*2014 : कुमार कामगार केसरी*
*2014 : नवी मुंबई महापौर केसरी*
*हा त्याच्या कुस्तीचा आत्तापर्यंतच्या कामगिरींचा तक्ता*.
त्याने 2014 साली नानझिन चीन मध्ये झालेल्या "युथ ऑलिम्पिक 2014 " कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.आत्ता आर्मी सेंटर मध्ये कुस्ती प्रशिक्षण घेत असणाऱा प्रकाश खूप मेहनत करत आहे.
*पै.प्रकाश कोळेकर या सारखे मल्ल ही महाराष्ट्राची खरी दौलत असून त्याच्या उत्तुंग ध्येयासक्ती ला, कुस्ती- मल्लविद्याला, मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!*