*राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात, कृष्णा नदीतील मासे मृत्युमुखी झाल्या प्रकरणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे कडून याचिका दाखल--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगलीत कृष्णा नदीतील प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्या प्रकरणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ,राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावतीने अॅड. असीम सरोदे यांनी, सोमवारी याचिका दाखल करून, याचिकेत साखर कारखाना, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेतील अॅड. असीम सरोदे, अॅड. सुधांश युरोपिया व अॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी हे सांगलीकर नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या व पर्यावरणाच्या रक्षणासाठी बाजू मांडत आहेत. त्यातील वकील अॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी हे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील रहिवासी असल्यामुळे, कृष्णा नदी पात्रातील प्रदूषणाची त्याला सखोल माहिती आहे.
दरम्यान साखर कारखान्यातून प्रदूषणात्मक विना प्रक्रियेचे सोडलेले पाणी, औद्योगिक कारखान्यांच्या वसाहती मधून येणारे प्रदूषित पाणी, शेरी नाल्याचे प्रदूषित पाणी व सध्याचे नदीतील वाहते नसणारे पाणी यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडले असून ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही कारवाई होत नाही. आजपर्यंत केवळ कारणे दाखवा नोटीसा काढण्यात येतात असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याचिकेत केला आहे. कृष्णा नदीच्या पात्रात लहान माशांपासून सुमारे सात ते दहा किलो पर्यंतचे मासे देखील मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरी वसाहतीना, शहरांतील नागरिकांना आरोग्याचा फार मोठा धोका निर्माण झाला आहे. सभोवतालच्या परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगलीतील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अौताडे यांनी नदीतील प्रदूषण होण्याच्या कारणांची मिमांसा करण्यात येत असून, त्याचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास पाठवण्यात येईल असे सांगितले आहे.