जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण आज जगात झाले असून ,जेव्हा चंद्र पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होत असते. यंदाच्या वर्षीचे सूर्यग्रहण हे मेष राशीत असून, यास फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण हे सूर्यग्रहण 19 वर्षानंतर मेष राशीत झाले असून, मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रावर, कृष्ण पक्षात अमावस्या तिथीला हे ग्रहण झाले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी 07 वाजून 05 मिनिटांनी सुरू झालेले सूर्यग्रहण, दुपारी ठीक 12 वाजून 29 मिनिटांनी संपले .या सूर्यग्रहणाचा कालावधी सुमारे 05 तास 24 मिनिटे होता .केतू ग्रहाचे प्राबल्य असलेल्या अश्विनी नक्षत्रात, हे सूर्यग्रहण झाले.
हे सूर्यग्रहण दक्षिण प्रशांत महासागरातील चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया ,मलेशिया, फिजी, जपान, समोआ, सोलोमन, ब्रुनेई, सिंगापूर, थायलंड, अंटार्टिका, ऑस्ट्रेलिया ,न्यूझीलंड, व्हिएतनाम , तैवान यासारख्या देशांमध्ये दिसले. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे सूर्यग्रहण सकाळी 07 वाजून 05 मिनिटांनी वरील देशांमध्ये सुरू होऊन, दुपारी 12 वाजून 29 मिनिटापर्यंत चालू होते .शिवाय भारतात हे सूर्यग्रहण कुठेही दिसणार नव्हते. भारतात हे ग्रहण कुठेही दिसणार नसल्याने, कुठेही याची चर्चा ऐकावयास मिळाली नाही.