जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्यात उद्यापासून दोन-तीन दिवस, अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभाग मुंबई यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आदी विभागात विजांच्या गर्जनेसह, अवकाळी पाऊस व गारपीट होण्याच्या शक्यतेचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील मध्य व दक्षिण विभागास आज येलो अलर्ट देण्यात आला असून, उद्या व परवा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाड्याच्या काही भागात उद्यापासून 15 एप्रिल पर्यंत, अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव येथे उद्या तसेच 14 तारखेला जालना वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात, तसेच पंधरा तारखेला धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याच्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याच्या शक्यतेचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.