जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजे 26 जून 2023 रोजी ,आम्ही भारतीय लोक आंदोलनाकडून, राजर्षी शाहू सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ठीक दुपारी 12:00 वाजता ही परिषद भरणार असून ,ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आज कोल्हापुरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात, सर्वपक्षीय बैठक पार पडली असून ,यावेळी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आर. के .पवार यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्रपणे येऊन दंगल घडवणाऱ्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर म्हणाले की ,कोल्हापुरी ही पुरोगामी आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराची भूमी आहे, त्यामुळे शाहू महाराजांचा विचार व वारसा जपण्यासाठी, राजर्षी शाहू जयंतीच्या दिवशी म्हणजे 26 जून 2023 रोजी, राजर्षी शाहू सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक, विवेकनिष्ठ पद्धतीने, सलोखा व संवादाच्या भारतीय परंपरेचा नाव मान राखून, आपल्या गावाला लागलेली कीड वेळीच निपटून काढूया असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केले आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच या दंगलीमध्ये अग्रभागी असून, मतांच्या राजकारणासाठी सरकारमधील प्रतिगामी पक्ष त्याला खत पाणी घालत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केला आहे .या बैठकीस काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे ,डॉक्टर मेघा पानसरे, शेतकरी कामगार पक्षाचे बाबुराव कदम, जनता दलाचे रवी जाधव, भारती पवार ,कॉम्रेड दिलीप पवार, सुभाष जाधव, बी. एल. बर्गे, बाबासाहेब देवकर यांची उपस्थिती होती व या सर्वांची भाषणे झाली.