जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीतील मिरज येथे उभारण्यात येणार्या 100 फूट उंचीच्या तिरंगा झेंड्याच्या प्रसारासाठी भव्य ‘तिरंगा फेरी’ काढण्यात आली. सांगलीतील मिरज येथे गांधी चौकात, सांगली जिल्ह्यातील एकमेव अशा 100 फूट उंचीचा तिरंगा झेंडा उभारण्यात येणार आहे. त्याच्या प्रचारासाठी भाजप नगरसेवक श्री. निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून मिरज शहरात 12 ऑगस्टला भव्य ‘तिरंगा फेरी’ काढण्यात आली. यात विविध सामाजिक संस्था, विविध संघटना, शिक्षक, राजकीय कार्यकर्ते, उद्योगपती, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांसह 32 शाळांमधील 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते.
मिरज हायस्कूल येथून निघालेल्या या फेरीचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सौ. सुमन खाडे, डॉ. विनोद परमशेट्टी, भाजप नेते श्री. सुरेश आवटी, नगरसेवक श्री. आनंदा देवमाने, श्री. शिवाजी दुर्वे, श्री. संदीप आवटी, तसेच श्री. प्रशांत खाडे, श्री. मोहन वाटवे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी श्री. सुरेश आवटी म्हणाले, ‘‘१५ ऑगस्टला कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.’’ कार्यक्रमाचा समारोप ‘वन्दे मातरम्’ ने झाला.