- पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघांत ,'घर चलो' अभियानात भाग घेणार.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे २० ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ करणार असून पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघात ‘घर चलो’ अभियानात सहभागी होणार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून ते राज्यव्यापी दौऱ्याचा करतील. या अभियानाच्या माध्यमातून एका महिन्यात ३ कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती पोहचविण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असे श्री.बावनकुळे यांनी सांगितले .
गुरुवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री.बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांचा विस्ताराने आढावा घेतला. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातला सर्वोत्तम भारत व आत्मनिर्भर भारत करण्याचा संकल्प केला, अशा वेळी मला भाजपा प्रदेशाचे अध्यक्षपद दिल्याचे सांगून ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभरात राज्यात फ्रेंड्स ऑफ बीजेपी, धन्यवाद मोदीजी, युवा वॉरियर्स असे वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानात राज्यातील मोदी सरकारच्या योजनांच्या २ कोटी लाभार्थींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देणारी पत्रे एकत्रित करण्यात आली आहेत. विविध क्षेत्रातील नामवंतांना ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ च्या माध्यमातून पक्षाच्या संपर्कात आणले गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ५० हजार रुग्ण मित्र तयार करण्याचे अभियानही सुरु करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानात आपण स्वतः सहभागी झालो.
२०२४ च्या निवडणुकीत मोदी सरकारच पुन्हा सत्तेवर यावे, यासाठी मतदान करण्याची नागरिकांची इच्छा असल्याचे या अभियानात आपल्याला दिसून आल्याचेही श्री.बावनकुळे यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, प्रदेशाध्यक्षांचे माध्यम प्रमुख रघुनाथ पांडे, प्रवक्ते अतुल शाह आदी उपस्थित होते.
पवारांनी टीका करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करावे.
अंत:मनातून पवार साहेब हे कधीही मोदीजींवर टीका करणार नाहीत, असे सांगून श्री बावनकुळे म्हणाले, खासगीत ते मान्य करतील की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान देशाला मिळाला नाही. ते राजकारणासाठी व विरोधासाठी विरोध करण्यासाठी टीका करीत आहेत. पवार साहेबांनी टीका करण्याऐवजी पक्षीय आत्मपरिक्षण करावे. त्यांच्या काळाचेही आत्मपरिक्षण करावे, त्यांच्या कार्यकाळातील पंतप्रधानांपेक्षा कितीतरी उंची मोदीजींची आहे. त्यांनी टीका करू नये अशी अपेक्षा श्री बावनकुळे यांनी व्यक्त केली.
देवेंद्रजीच्या कामाने जनतेत विश्वास.
जगातील, देशातील व राज्यातील सर्वांत मोठा पक्ष भाजपा आहे. आम्ही कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही, आमच्यासोबत अनेकदा बेईंमानी झाली आहे. हे जनतेला कळले आहे. भाजपा हाच जनतेला न्याय देऊ शकते हे कळले आहे. आमचे नते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या विकास कामामुळे लोकांत विश्वास तयार झाला आहे, हे राज ठाकरे यांनी समजून घेतले तर ते पुढे बोलणार नाहीत. मोदीच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी जे लोक सोबत येतील त्या सर्वांचे स्वागत केले जाईल. देवेंद्रजीचे समर्पण हीच आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांची ऊर्जा आहे.