- दमदार कलाकारांची गॅंग असलेला चित्रपट २० ऑक्टोबरला प्रदर्शित.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर,ता.२५ -मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर 'बॉईज'च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. 'बॉईज ३'च्या भरघोस यशानंतर आता 'बॉईज ४' धमाका करायला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच 'बॉईज ४'चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून आता नुकतेच या चित्रपटाचे टिझरही प्रदर्शित झाले आहे.
'बॉईज ४' मध्ये धैर्या, ढुंग्या आणि कबीर सोबत नवी गँगही सहभागी झाली आहे.यावेळी या चित्रपटात बरेच नावाजलेले चेहरे झळकणार आहेत.त्यामुळे आता ही धमाल चौपट होणार आहे.यावेळी सुमंत शिंदे,पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत ऋतिका श्रोत्री,अभिनय बेर्डे,निखील बने,गौरव मोरे,ऋतूजा शिंदे,जुई बेंडखळे ही नवी गॅंगही सहभागी झाली आहे.याव्यतिरिक्त गिरीष कुलकर्णी,यतीन कार्येकर,समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.त्यामुळे जबरदस्त कलाकारांची ही फळी तुफान मस्ती करताना दिसणार आहे. ‘बॅाईज’ हा मराठी सिमेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे,ज्याचे चार भाग आले आहेत आणि यातील प्रत्येक भागात काहीतरी सरप्राईज होते.आता ‘बॅाईज ४’मध्येही काहीतरी भन्नाट सरप्राईस असेल.आता यात कोणाच्या काय व्यक्तिरेखा आहेत आणि कोण काय काय धमाल करणार आहेत, हे मात्र २० ऑक्टोबरला ‘बॅाईज’ आल्यावरच कळेल.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा.लि.प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे,राजेंद्र शिंदे,संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.या मैत्रीने अवघ्या महाराष्टात धुमाकूळ घातला होता.मात्र टिझरमध्ये त्यांच्या या मैत्रीत आता दरार आल्याचे दिसत आहे. आता ही मैत्री संपुष्टात येणार की त्यांची ही गॅंग आणखी वाढणार,याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे.एवढे मात्र नक्की की हे अफलातून कलाकार यंदा तुफान धिंगाणा घालणार आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर म्हणतात, '' आतापर्यंत धैर्या,ढुंग्या आणि कबीरची मस्ती तुम्ही पाहिली आता ही मस्ती आणखी वाढणार आहे. ‘बॅाईज ४’ मल्टीस्टारर फिल्म आहे त्यामुळे यांची मस्तीही मल्टीपल होणार आहे. शाळा,ज्युनियर कॅालेज नंतरचा ‘बॅाईज’चा हा डिग्रीचा प्रवास सुरू होणार आहे.या त्रिकुटाच्या मैत्रीची सुरवात,चांगल्या, वाईट प्रसंगी एकमेकांना दिलेली साथ,थट्टामस्करी यापूर्वीच्या तीन भागांमध्ये सर्वांनी पाहिलेली आहे.मात्र आता या मैत्रीत ट्विस्ट येणार आहे. ’बॉईज’ च्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.प्रत्येक वेळी आम्ही प्रेक्षकांसाठी कथेत नवनवीन वळणे आणली.यावेळीही असेच सरप्राईज आहे.त्यात आता आणखी जबरदस्त कलाकार सामील झाले आहेत.त्यामुळे आता ही धमाल चौपट झाली आहे.''