जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(प्रतिनिधी:अनिल जोशी)
कोल्हापूरतील प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही, वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालून वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवाला प्रदूषणास जबाबदार ठरवतात. त्यातून ‘गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण’, असे समीकरण जुळवून गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे.अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे.तरी गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवून गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री.दीपक देसाई,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे जिल्हाप्रमुख श्री.मनोहर सोरप आणि श्री.नंदकुमार घोरपडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, बजरंग दलाचे श्री. प्रथमेश मोरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री.अवधूत चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, मधुकर नाझरे उपस्थित होते.
या वेळी करण्यात आलेल्या मागण्या--
1. गणेशभक्तांकडून ‘मूर्तीदान’ प्रशासनाने वा अन्य अशासकीय संस्थांनी घेऊ नये, तसेच प्रतीवर्षी लाखो-कोट्यवधी रुपये व्यय करून कृत्रिम तलाव सिद्ध करण्यात येऊ नयेत.
2. गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन पंचगंगा नदीवर बॅरिकेटस् लावून मूर्तीविसर्जन करण्यास बंदी करते. तरी असे न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे,त्यांना ते करू देण्यात यावे.
3. श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्या ‘यांत्रिक पद्धतीचा’(कन्व्हेअर बेल्ट)ची व्यवस्था करू नये.असे करण्याऐवजी महापालिकेने इराणी खाण येथे विसर्जनासाठी घाट पद्धतीने पायर्यांचे बांधकाम केल्यास भाविकांनी थेट आत उतरून विसर्जन करणे शक्य होईल.
4. गतवर्षी भाविकांकडून दान म्हणून घेतलेल्या गणेशमूर्ती इराणी खण येथे फेकून देतांनाचा ‘व्हिडिओ’ समोर आला होता. असे करणे हा भाविकांनी ज्या श्रद्धेने श्रीगणेशमूर्ती दिल्या त्या धर्मभावनांना हा अवमान आहे. तरी गणेशमंडळांना, तसेच गणेशभक्तांना पूर्वापार धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रातील मूर्तीविसर्जन करण्यास अनुमती दिल्यास असे प्रकार आपोआपच टळतील.