जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील तासगावचा श्री गणेश रथोत्सव सोहळा लाखो भक्त-भाविकांच्या उपस्थितीत,गुलाल-पेढे-खोबऱ्याची उधळण करीत संपन्न झाला.यंदाच्या वर्षीचा ऐतिहासिक असा 244 वा रथोत्सव बुधवारी पार पडला असून,तासगावच्या श्री गणपती पंचायतनच्या रथोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास पटवर्धन राजवाड्यातून, 121 किलो पंचधातूची श्रींची उत्सव मूर्ती,पालखीतून मंदिरा बाहेर रथापर्यंत आणण्यात आली.श्री गणेशाचा रथ,केळीचे खुंट,नारळाची तोरणे,पताका,फुलांच्या माळा आदींनी सजवण्यात आला होता.रस्त्याच्या दुतर्फा रथमार्गावर,श्री गणेश भक्तांनी रांगोळ्या काढल्या होत्या.त्यानंतर श्रींच्या आरतीनंतर,श्री गणेशोत्सवाचा रथ ओढण्यास भक्त-भाविकांनी सुरुवात केली.गणेश रथोत्सवाच्या मिरवणुकीत लाखो गणेश भक्त-भाविक," गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" "मोरया मोरया" असा अखंड नामघोष करत,गुलाल- पेढे- खोबरे उधळण करीत, दोरखंड हातात घेऊन रथ ओढत होते.श्री गणेश रथोत्सवात तल्लीन झालेल्या पारंपारिक मानकरींसह श्री गणेश भक्त-भाविकांच्यात उत्साह ओसांडून वाहत होता.श्री गणेशाचा रथ,श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत जाऊन तेथे श्रींची आरती होऊन, परत श्री गणेश मंदिरातकडे मार्गस्थ झाला.
यंदाच्या वर्षीचा श्री गणेशोत्सवाचा 244 वा रथोत्सव, श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन, डॉ. आदिती पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दिमाखात व भक्तिमय वातावरणात पार पडला असून,राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई,खासदार संजय काका पाटील,आमदार सुमनताई पाटील,प्रभाकर पाटील,रोहित पाटील,पटवर्धन कुटुंबीय,पारंपारिक मानकऱ्यांसह लाखोंच्या संख्येने गणेश भक्तांनी दर्शनात व रथोत्सवात सहभाग घेतला.
यंदाच्या वर्षीचा तासगाव मधील श्री गणेशाचा सोहळा पार पडण्यासाठी,जिल्हा प्रशासनाकडून चोख बंदोबस्त व नियोजन करण्यात आले होते.आजच्या रथोत्सव सोहळा प्रसंगी पोलीस उपअधिक्षक सचिन थोरबोले,पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, तहसीलदार रवींद्र रांजणे,मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी रथोत्सव सोहळ्यावर शांततेने पार पडण्यासाठी देखरेख ठेवली होती.