जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात काल सर्वत्र "गणपती बाप्पा मोरयाच्या" घोषणेने, मिरवणुकीने, अतिउल्हासात श्री गणेशरायाचे आगमन घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळात झाले आहे. कालपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्यातील गणेशोत्सवात ठिकठिकाणी, सार्वजनिक मंडळात परंपरेप्रमाणे,5 दिवस,7 दिवस,9 दिवस आणि अनंत चतुर्दशी पर्यंत उत्स्फूर्तपणे गणेशोत्सव साजरा केला जातो.
देशाचे महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थी निमित्त काल संपूर्ण भारतवासीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देखील जनतेला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
देशात आणि महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, परंपरेप्रमाणे,श्री गणेशोत्सव साजरा होत असतो. देशातील व महाराष्ट्र राज्यातील राजकीय नेते, चित्रपट क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती,मान्यवर उद्योगपती आणि इतर अनेक प्रतिष्ठित लोकांच्या घरी देखील,श्री गणेशाची प्रतिष्ठापना काल झाली आहे.महाराष्ट्र सार्वजनिक मंडळात विविध देखावे,पौराणिक देखावे,सध्याच्या राजकीय परिस्थितीवरील देखावे आणि जिवंत देखावे सादर केले जातात.राज्यातील सार्वजनिक मंडळातील गणेश मंडळाच्या गणपतीला फार मोठी गर्दी होत असते.
राज्य शासनाने श्री गणेश भक्त -भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून, स्थानिक प्रशासनांना व जिल्हा पोलीस प्रशासनास, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून,योग्य त्या सूचना दिल्या असून,सर्व व्यवस्था चोख केली आहे.एकंदरीत सर्वत्र राज्यात श्री गणरायाचे काल मोठ्या उत्साहात आगमन झाले असून,रितीरिवाज- परंपरेप्रमाणे गणेशोत्सवाची मोठी राज्यात धामधूम चालू असल्याचे दिसून आले आहे.