जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या,नांदेड येथे शासकीय कृषि महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठी अनेक हवसे-गवसे पुढे आले आहेत. चार-दोन महिन्यांपूर्वी आम्ही पत्र दिले म्हणूनच हे महाविद्यालय मंजूर झाल्याचा त्यांचा अविर्भाव आहे.पण शासकीय महाविद्यालय मंजूर करून घेण्यासाठी दीर्घ प्रक्रिया असते.नांदेडच्या कृषि महाविद्यालयाच्या मान्यतेचा प्रवास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या काळात सुरू झाला. २२ मे २०१३ रोजी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी नांदेड येथे स्व.शंकरराव चव्हाण यांच्या नावाने शासकीय कृषि महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली. त्यानंतर काँग्रेस आघाडीचे सरकार गेले व प्रस्तावाची गती मंदावली. ५ डिसेंबर २०१८ रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या विद्वत परिषदेने तर ८ डिसेंबर २०१८ रोजी कार्यकारी परिषदेने मान्यता दिली. २८ मार्च २०१९ रोजी हा प्रस्ताव राज्य शासनाला सादर झाला.नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले व तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुन्हा हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.कृषि विभागाने सदरचा प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाकडे सादर केला.राज्यातील कृषि महाविद्यालयांचा बृहत आराखडा तयार झालेला नसल्याने नव्या महाविद्यालयाला परवानगी देण्यात अडसर निर्माण झाला. मात्र, नांदेड जिल्ह्यातील कृषि शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सदर शासकीय कृषि महाविद्यालयाला विशेष बाब म्हणून तातडीने मान्यता देण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
दरम्यान राज्यात पुन्हा सत्तांतर झाले.त्यानंतरही अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू ठेवला आणि अखेर नांदेडच्या शासकीय कृषी महाविद्यालयाचे स्वप्न पूर्णत्वास आले.

