जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त:-सोशल मीडिया
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानुसार,खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्या पक्षाचे चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पक्षाचे नाव व पक्षाचे चिन्ह घड्याळ हे अजित पवार यांच्या गटाकडे राहणार असल्याचा निकाल दिला असून,सद्य विधिमंडळातील बहुमताची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय दिला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचे अजित पवार गटाने स्वागत केले असून,राज्यभर जल्लोषासह आनंद व्यक्त केला जात आहे,मात्र शरद पवार गटाने याबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत स्वतःच्या पक्षाचे नाव व चिन्ह देण्यासाठी,तीन पर्यायसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची मुदत दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी,नेते शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड देखील रद्द ठरवली आहे.दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आम्ही विनम्रपणे स्वीकारत असून,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वृद्धिंगत करण्यासाठी कटीबद्ध कालही होतो,आजही आहोत,भविष्यातही राहू असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
त्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून,देशातील सर्वच घटनात्मक संस्थानी स्वायत्तता गमावली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध जाणार असून,आमच्यासाठी हा निर्णय आश्चर्यकारक नाही असे प्रतिपादन शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.एकंदरीतच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटास मिळाल्यामुळे, शरद पवार गटास मात्र धक्का बसला आहे.