*महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचा आदेश--- मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पाऊस कोसळत असून, राज्यातील शेतकरी वर्गाच्या चिंतेत वाढ झाली आहे .राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले असून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज सकाळी राज्याचे मुख्य सचिव तसेच पिकांचे नुकसान झालेल्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून, तातडीने नुकसानीची पाहणी करून, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र ,ठाणे, उत्तर महाराष्ट्र, मुंबई येथील बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने, मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी विधानसभेत उद्या आवाजात उठवणार असल्याचे म्हणाले आहेत. विरोधी पक्षांचे नेते याबाबतीत एकत्र येऊन, उद्या या प्रश्नावर आवाज उठवतील असे दिसत आहे .महाराष्ट्र राज्यात सध्या वातावरण देखील ढगाळ असल्याने कधी कुठे अवकाळी पाऊस होईल हे सांगता येत नाही. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता दिली आहे.