जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )देशभरात महाराष्ट्रासह कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, एकीकडे चिंतेचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसत आहे, परंतु दुसरीकडे आरोग्य विषयक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाला अजिबात घाबरून जाऊ नये. त्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव नवीन नसून, देशात कुठेही लॉकडाऊन होण्याची शक्यता नाही असे मत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. मागील काही वर्षी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची भूमिका फार महत्त्वाची असून, ते सध्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या साथीजन्य व संसर्गजन्य रोगाच्या विभागाचे, प्रमुख राष्ट्रीय आरोग्य तज्ञ म्हणून काम पहात आहेत.
दरम्यान देशातील 140 कोटी लोकसंख्येच्या मानाने सध्याची कोरोना रुग्ण संख्या ही अत्यल्प असून, मीडिया माध्यमानी सुद्धा यावर जास्त लेखन करणे उचित वाटत नसल्याचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले आहे. सध्याची देशातील कोरोना रुग्णाच्या प्रादुर्भावाची संख्या ही अत्यंत कमी असल्याने ,नागरिकांनी घाबरून जाऊ नये, शिवाय ह्या कोरोना व्हेरिएंट चा प्रकार हा नवा नसून, देशात कुठेही लॉकडाऊन ची शक्यता त्यांनी फेटाळली आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे देखील वाढणार नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. देशातील मधुमेह, ब्लडप्रेशर, हृदयरोग आदी रोगग्रस्त असलेले वयस्कर नागरिकांनी काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना रोगाच्या प्रतिकारतेसाठी असणाऱ्या लसी, या सध्याच्या परिस्थितीत कोरोना विरोधात लढण्यासाठी पुरेशा काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान केंद्र सरकारने कोरोना रोगाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी आलेल्या अनुभवाच्या आधारावर, विविध उपाय- योजना हाती घेतले असून, नागरिकांनी अजिबात कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये असेही डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले आहे.