जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
अमळनेर येथे भरणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे .याबाबतची आज घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. उषा तांबे यांनी पुणे येथे वार्ताहर परिषदेत केली .ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी, इच्छुक व स्पर्धेत होते .आज झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाबाबत व तारखांबाबत निर्णय झाला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत, ज्येष्ठ कवी दवणे व डॉ. शोभणे यांच्याबरोबर ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. न.म .जोशी, जेष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर, समीक्षक ऋषिकेश कांबळे यांच्या नावावरही बरीचशी चर्चा होऊन, चर्चेअंती शेवटी डॉ. रवींद्र शोभणे यांच्या नावावर अध्यक्षपदाची मोहर लागली. त्याबरोबरच दि. 2,3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे भरवण्याचे ठरवण्यात आले. अमळनेर मध्ये यापूर्वी 1952 मध्ये कृष्णाजी पांडूरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली, 35 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलेले होते .त्यामुळे त्यानंतर आता परत दुसऱ्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 97 वे अमळनेर येथे भरत आहे ही गौरवाची बाब आहे.