जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने आज घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 200 रुपयांची कपात करून,राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला महिला भगिनींना भेट दिली आहे.यापूर्वी घरगुती गॅस कनेक्शन असलेल्या उज्वल लाभार्थींना 200 रुपयाची सूट मिळत होती, पण आता घरगुती गॅस सिलेंडर असलेल्या उज्वला योजनेच्या लाभार्थी ग्राहकांना जवळपास 400 रुपयांची सूट प्रति सिलेंडर मिळणार आहे. सर्वसाधारणपणे सर्व घरगुती गॅस सिलेंडर धारकांना 200 रुपये प्रति सिलेंडर,पूर्वीच्या असलेल्या किमतींत कपात करून देण्याचा निर्णय,आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी नवी दिल्ली येथे दिली. देशातील सर्व महिला गॅस ग्राहक लाभार्थींना ही एक राखी पौर्णिमेची भेट समजायला हरकत नाही.
आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन,राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सर्व घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना 200 रुपये प्रति सिलेंडर कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याने कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन, राखी पौर्णिमेनिमित्त भगिनींना अधिकाधिक समाधान मिळून आयुष्य आणखी सुखकर व्हावे अशी माझी प्रत्येक भगिनींबद्दल देवाकडे प्रार्थना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशातील जवळपास 33 कोटी गॅस ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार असून,जवळपास 10 कोटी 35 लाख एवढ्या उज्वला योजनेच्या गॅस ग्राहक लाभार्थीना देखील याचा लाभ मिळणार आहे.दरम्यान केंद्राच्या आजच्या गॅस ग्राहकांना प्रति सिलेंडर दिलेल्या 200 रुपये च्या कपातीने,सरकारी तिजोरीवर जवळपास 7000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे,अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी दिली आहे. एकंदरीतच यापुढील येणाऱ्या सणासुदीच्या काळात, केंद्र सरकारने घेतलेल्या गॅस ग्राहकांना प्रति सिलेंडर दिलेल्या 200 रुपये च्या कपातीचा निश्चितच फार मोठा फायदा व सण उत्साहवर्धक साजरा करण्यास हातभार लागणार आहे.