जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी गावामध्ये असलेल्या,समता अनुदानित आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना काल दि. 27 ऑगस्ट रोजी रात्री जेवणानंतर अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे दिसून आल्यानंतर,या विद्यार्थ्यांना जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले. याची दखल घेत गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज ग्रामीण रूग्णालय जत येथे भेट देवून या घटनेची सविस्तर माहिती घेतली. जत रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना धीर दिला. अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवरती आवश्यक ते योग्य उपचार करावेत, अशा सूचना श्री.सावे यांनी आरोग्य प्रशासनास दिल्या.
दरम्यान सर्व मुलांना भेटून मी त्यांची चौकशी केली असून, 120 मुले व 54 मुलींची प्रकृती स्थिर आहे. राज्य शासनाकडून त्यांची पूर्णपणे काळजी घेतली जात असून,त्यांना मदतीमध्ये कोणतीही कमतरता भासणार नसल्याचे आश्वासन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यानी दिले आहे. ऊमदीतील अनुदानित समता आश्रम शाळेतील घडलेला प्रकार हा गंभीर असून,जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करू असे आश्वासनही राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.दरम्यान मानव मित्र संघटनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज,सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मदत सुरू केली आहे.
यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसिलदार जीवन बनसोडे,समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, वैद्यकीय अधीक्षक श्रीमती डॉ. देशमुख, गटविकास अधिकारी आप्पासो सरगर उपस्थित होते.