जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
चारचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GF दि.4 ऑक्टोबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे.त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन चारचाकी नोंदणी मालिका MH09- GM दि.25 सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येत आहे.पसंती क्रमांकाचे अर्ज दि.25 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेतच स्वीकारण्यात येतील,अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली आहे.
पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी.(धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये.धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही.पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत आणून द्यावा.धनाकर्ष शक्यतो STATE BANK OF INDIA (SBI) या बँकेचाच असावा.धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव,मोटार वाहनाचा प्रकार,मोबाईल क्रमांक व मागणी केलेली मालिका पसंती क्रमांक लिहीणे आवश्यक आहे.
एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांकडून दि. 26 सप्टेंबर रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाप्यात सकाळी 9.45 ते दुपारी 3 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एक पेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाचा लिलाव दि. 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वा. कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल.अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे,असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.पाटील यांनी कळविले आहे.