जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी,सांगलीत कृष्णा नदीला पाणी नसावे,यासारखी खेदाची गोष्ट नाही ही सांगलीकराची भावना आहे.मूर्ती विसर्जनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रयत्न का केले नाहीत?असा आरोप सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की,पावसाने ओढ दिल्यामुळे कृष्णा नदीत पाणी नाही हे जरी खरे असले तरी, सांगली व गणपती बाप्पा यांच भावनिक नातं आहे.उत्सवाच्या निमित्ताने कोयना धरणातील पाणी तातडीने सोडून ते सांगली बंधाऱ्यापर्यंत आणण्याची व्यवस्था वेळीच करण्याची गरज होती.याबाबत आमदार सुधीर गाडगीळ यांनी सतर्कता बाळगून,जलसंपदा मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला हवा होता,उत्सवासाठी खास बाब म्हणून पाणी सोडायला हवे होते,त्यांनी ते केले नाही.
पाटील यांनी पुढे म्हटले आहे की,आधीच नदीत पाणी नाही आणि तशातच शरीनाल्याचे दूषित पाणी नदीत सोडले जात आहे, हे तर अतीच झाले.सांगली शहरातील नागरिकांच्या भावनेशी चाललेला हा खेळ आहे.तो ते कदापि सहन करणार नाहीत.पाटबंधारे खात्याने कोयना धरणातील पाणी सोडण्याबाबतचे नियोजन काटेकोरपणे करायला हवे होते.गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याचा काही आराखडा तयार करणे आवश्यक होते,त्याबाबत त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे का? या लोकांना पाठीशी घालण्याचे काम काही मंडळी करत असतील तर ते चुकीचे आहे.जलसंपदा मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांनीही याकडे कानाडोळा केला आहे.उत्सवाचे गांभीर्य त्यांना वाटले नसावे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.