- टंचाईग्रस्त जिल्ह्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून चारा पुरवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या.
- नियोजनानुसार पाण्याचे आवर्तन द्या.
- पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करा.
- दूधगंगा धरणाच्या गळती दुरुस्तीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादन घेतले जात असून यामध्ये मका (मुरघास) घेतल्यास टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील जनावरांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून चारा पुरवता येवू शकेल.यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे,अशा सूचना करुन पावसाने ओढ दिल्यास खरीपाच्या पिकांना धोका पोहोचू नये,यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दूधगंगा व अन्य धरणातून पाणी सोडण्यात यावे,अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी या धरण प्रकल्पांच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात घेण्यात आली.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार पी.एन.पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, स्मिता माने, समरजितसिंह घाटगे तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातून खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी राजा दयानिधी तसेच अन्य मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
यावर्षी पहिल्यांदाच खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे उभ्या पिकांसाठी पाण्याची मागणी होत आहे.पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊन खरीप हंगामात येत्या 8 दिवसात आवर्तन द्यावे.तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी पाण्याचा वापर कमीत कमी करुन पाण्याची बचत करावी.असे आवाहनही त्यांनी केले. दूधगंगा धरणाची गळती व दुरुस्तीबाबतच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजूरी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल,असे सांगून जिल्ह्यातील नादुरुस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. याबरोबरच जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी उपाययोजना करा.बैठकीत वारणा, राधानगरी, तुळशी धरणांच्या पाणीसाठ्याचेही नियोजन करण्यात आले.या तीन धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे.परंतु संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन पाण्याचा वापर जपून करावा.असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.कोल्हापूर जिल्ह्यात पुरेसे पाणी उपलब्ध असून ऊस क्षेत्र सुद्धा अधिक आहे.इथले शेतकरी सधन आहेत.या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांनी ऊस पिकांमध्ये जनावरांसाठी मका (मुरघास) चारा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी जलसंपदा व कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे,तसेच हा चारा शासनाच्या वतीने विकत घेऊन राज्यातील अन्य दुष्काळी भागांतील जनावरांना पुरवता येईल यामुळे शेतकऱ्यांनाही उत्पन्न मिळेल,असे त्यांनी सांगितले.नद्यांची वहनक्षमता वाढवण्यासाठी तसेच पूर नियंत्रणासाठी नदीतील गाळ काढून खोलीकरण करा.पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी राजाराम बंधा-याला केलेल्या बरग्यांच्या व्यवस्थेप्रमाणे इतर बंधाऱ्यांनाही उपाययोजना करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
बैठकीत इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत किणीकर यांनी जलसंपदा विभागाने वाढ केलेली सिंचन पाणीपट्टी कमी करावी, असे आवाहन केले. याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री केसरकर यांनी दिल्या. तसेच राधानगरीसह जिल्ह्यातील विविध पर्यटन विषयांच्या कामांचा आढावा घेऊन ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.दूधगंगा धरणाची गळती व धरणातील पाणीसाठा आणि पाण्याच्या मागणीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. तसेच पाण्याच्या पुनर्वापराचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील चिकोत्रा, नागणवाडी व आंबेओहोळ प्रकल्पांच्या पाणी नियोजनाच्या बैठका तातडीने घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, जेणेकरुन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. तसेच शेतीसाठीचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.जिल्ह्यातील बंधाऱ्यांची दुरुस्ती करुन घ्यावी. जेणेकरुन गळतीमुळे पाणी वाहून जाणार नाही, असे सांगून पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी पाण्याचे आवर्तन सोडावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले.जलसंपदा विभागाच्या वतीने समितीचे सदस्य सचिव तथा अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
सध्या दूधगंगा धरणात 20.09 मिली म्हणजे 84 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी 10.78 टीएमसी पाणी दूधगंगा खोऱ्यातील डावा, उजवा कालवा व नदीद्वारे सिंचनासाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच धरणातून कोल्हापूर शहरासाठी 2 टीएमसी व पंचगंगा खोऱ्यातील सिंचनासाठी 3.02 टीएमसी पाणी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कर्नाटक राज्याच्या वाट्याच्या 4 टीएमसी पाण्यापैकी 2.87 टीएमसी पाणी कर्नाटक राज्याला दिले जाणार आहे. सिंचनासाठी खरीप हंगामासाठी 1 तर रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी 4 अशी एकूण 9 आवर्तने कालवा व नदीद्वारे देण्यात येणार आहेत. या पाण्याद्वारे राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल व भुदरगड या तालुक्यातील सुमारे 61 हजार हेक्टर पीक क्षेत्राला पाणी दिले जाणार आहे, अशी माहिती श्री. म्हेत्रे यांनी दिली.कोल्हापूर महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्यासाठीची जलसंपदा विभागाची पाणीपट्टी थकबाकी तातडीने भरण्याबाबत कार्यवाही करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले.
कालवा सल्लागार समितीच्या बैठका दरवर्षी 15 ऑक्टोबर दरम्यान रब्बी हंगाम सुरु होताना घेण्यात येतात. तसेच धरणातील उपलब्ध पाणीसाठा वर्षभर पुरवण्यासाठी नियोजन करण्यात येते. परंतु यावर्षी पावसाळी हंगामात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती राज्यात निर्माण झाल्यामुळे जलसंपदा विभागाने कालवा सल्लागार समितीच्या बैठका तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील बैठक आज घेण्यात आली.या बैठकीनंतर भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे राबवण्यात येत असलेल्या "मधाचे गाव पाटगाव" या उपक्रमाच्या सद्यस्थितीची माहिती त्यांनी घेतली. महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी यांनी सादरीकरणाद्वारे उपक्रमाची माहिती दिली.