जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारत देशाला भुकेपासून मुक्त करण्याचा ध्यास ज्यांनी घेतला व ज्यांच्यामुळे देशाचा अन्नधान्याचा तुटवडा कमी झाला,याचे निश्चितच निःसंशयपणे श्रेय,हरित क्रांतीचे जनक डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांना जाते.डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांनी शेतीचे जनक शास्त्र आणि ग्रामीण अर्थशास्त्र यावर मूलभूत सिद्धांतावर चिंतन केले होते.दिल्लीमध्ये त्यांनी फाळणीचा हिंसाचार बघून,दुःख निवारणाची प्रेरणा घेतली असावी असे वाटते.डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांनी आयुष्यभर दारिद्र्य आणि भूक या दुःखाच्या दोन चेहऱ्याशी जनतेसाठी संघर्ष केला.
देशातील तांदळाच्या वाढीव उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांनी रिसर्च फाउंडेशनची स्थापना करून,गव्हाचे उच्च उत्पन्न देणारे बियाणे विकसित करण्यात,त्यांची भूमिका अतिशय मौलिक ठरली आहे.1987 मध्ये त्यांना पहिल्या जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1971 मध्ये डॉ.एम एस.स्वामीनाथन यांना रामन मॅगसेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.परंतु ह्याच देशात स्वामीनाथन आयोगाची त्यांच्या हयातीत अंमलबजावणी झाली नाही,हे एक प्रकारे दुर्दैव म्हणावे लागेल.आजच्या देशातील हवामान बदलामुळे, देशातील शेती कशी करावी? शेती कशासाठी करावी? पिके कुठली घ्यावीत? या शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देणारा डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांच्यासारखा द्रष्टा,आज या जगातून नाहीसा झाला आहे हे खूप वाईट आहे.आज पर्यंत डॉ.स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचा अहवाल, अद्यापि भारतात कुठल्याही सरकारने स्वीकारला नाही हे एक दुर्दैव असून,देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हा अहवाल स्वीकारून अंमलबजावणी करणे,हीच एक शेवटची त्यांना श्रद्धांजली ठरेल.