जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
श्रीमन् परमपूज्य नारायण स्वामी हे श्री दत्तात्रेय द्वितीय अवतार नरसिंह सरस्वती यांचे अतिप्रिय शिष्य व त्याबरोबरच नृसिंहवाडी येथे आजही श्री गुरुपूजे अगोदर अग्रपूजेचा मान म्हणून, शिष्य परमपूज्य नारायण स्वामी यांचा आहे.गुरु शिष्य परंपरेतील ही एक आध्यात्मिक दुर्मिळ घटना असून,आजही नृसिंहवाडी येथे दत्तात्रेय द्वितीय अवतार नरसिंह सरस्वती दत्तात्रेय महाराज यांच्या गुरुवचनाप्रमाणे, अगोदर दर्शन परमपूज्य नारायण स्वामी यांचे घेण्याचा रिवाज आहे. श्रीनारायणस्वामी (समाधी सन-१८०५)
जन्म: गार्ग्य गोत्री देशस्थ ब्राह्मण,उपनाव जोशी,जन्मदिवस ज्ञात नाही.
कार्यकाळ: -१८०५
संप्रदाय: दत्त संप्रदाय.
समाधी: चैत्र वद्य अमावस्या, इ.स.१८०५,वैकुंठी विमानातुन गेले.
श्री.नारायणस्वामी – पूर्वाश्रमात विसापूर ग्रामनिवासी गार्ग्य गोत्री देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण,महाराष्ट्रीय.उपनाव जोशी.
पूर्ववयात विद्या व सदाचारसंपन्न असल्याने त्या प्रांतात विद्वन्मान्य होते. पहिली पत्नी परलोकवासी झाल्यावर कोल्हापूर प्रांतातील तारळे गावातील श्री.रामदीक्षित गुळवणी यांच्या कन्येबरोबर त्यांचा दुसरा विवाह झाला व त्यांना विश्वंभर नावाचा पुत्र झाला.याप्रमाणे सुखाने त्यांचा संसार चालला होता. एकदा पुण्यात विद्वत्सभेत शास्त्रार्थात त्यांचा पराभव झाल्याने,त्यांना अत्यंत खिन्नता प्राप्त झाली.पुन:शास्त्रात असा पराभव न व्हावा म्हणून त्यांनी अधिक अध्ययन करण्याकरता घरदार सोडून ते काशीला गेले व त्या ठिकाणी चांगल्या गुरूच्या जवळ राहून गुरूंची उत्तम सेवा करून, सर्व शास्त्रांत पारंगत झाले.
श्रीनारायणस्वामींचा शास्त्राध्ययन करण्याचा उद्देश गुरूंनी ओळखून त्यांच्याजवळ ‘वादामध्ये कोणाचाही पराभव करणार नाही’ अशी गुरुदक्षिणा मागितली.ती आज्ञा मान्य करून श्रीनारायणस्वामी आपल्या गावी परत आले. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या व काही वर्षांनी पत्नी स्वर्गवासी झाली. पुत्राला विद्याभ्यासासाठी पुण्याला ठेवून आपल्या दोन मुलींसह कोल्हापूरला श्रीजगदंबेच्या सेवेला ते राहिले. भगवतीने संतुष्ट होऊन त्यांना,नरसोबाच्या वाडीला जाऊन श्रीदत्ताची आराधना करण्याची आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे श्रीकृष्णपंचगंगेच्या संगमावरील श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीत मुलींसह राहून श्रीदत्ताची उपासना करू लागले.
ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या पारमार्थिक इतिहासामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे स्थान ध्रुवपदाप्रमाणे अढळ आहे. त्याप्रमाणे संतश्रेष्ठ नारायण स्वामींचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे. श्री दत्तात्रेयांनी या आपल्या अंतरंग एकमेवाद्वितीय शिष्याला व त्यांच्या उत्कट भक्तीला प्रसन्न होऊन ‘अग्रपूजेचा’ अधिकार बहाल करून, त्याप्रमाणे आजही दत्तात्रेयांच्या पूर्वी त्यांची पूजा केली जाते.
नारायण स्वामींचा जन्म विसापूर (पूर्वकालीकर्नाटक व सध्या महाराष्ट्रातील) गावातील गार्ग्य गोत्री जोशी कुटुंबात झाला. उपनयना नंतर वेदशास्त्रांचा सांगोपांग अभ्यास केला. नेहमी ब्रह्मकर्मात रमणाऱ्या स्वामींनी, ‘जन्मभर अपराजित राहीन’, अशी महत्त्वाकांक्षा मनाशी ठेवून काशी क्षेत्री प्रयाण केले. तेथील सद्गुरूंच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतले आणि ‘आजन्म कोणाशीही वाद घालणार नाही’ असा संकल्प केला. त्यांचा हा संकल्प म्हणजे त्यांची गुरुदक्षिणाच होती.त्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. सद्गुरूंच्या आशीर्वादाने अत्यानंदित झालेले नारायणशास्त्री कोल्हापूरात आल्यानंतर ते वाडीस श्रीदत्त दर्शनास आले. कृष्णा पंचगंगा तीरावरील निवासी भक्तकामकल्पद्रुम श्री नृसिंहसरस्वती महाराज तुमच्यावर कृपा करून स्वत:च तुम्हाला चतुर्थाश्रमाची दीक्षा देऊन कृतार्थ करतील. या महालक्ष्मीच्या आशीर्वादाप्रमाणे विरक्त वृत्तीने व दत्तभक्तीने प्रेरित झालेले हे विद्वानशास्त्री, वाडीत पादुकारूपाने वास्तव्य करणाऱ्या नृसिंह सरस्वतींचे शिष्य बनले.
भक्ताच्या मनीची इच्छा जाणून घेणाऱ्या श्री नृसिंहसरस्वतींनी, कृष्णा पंचगंगा संगमावर त्यांना घेऊन जाऊन, तीन दिवस संगमातील अमरापूर येथे संन्यास दीक्षा दिली.त्यासाठी आवश्यक प्रायश्चित्त देऊन दंड,कमंडलू,काषायवस्त्रादि देऊन ‘नारायण सरस्वती’ असे नाव ठेविले.संन्यासी वेषात गुरुपादुकांच्या दर्शनासाठी मंडपात येऊन पादुकांना परमप्रेमाने दंडवत केला. दंडधारी वेषांत गावात आल्यानंतर पुजारी मंडळी शंकित झाली तेव्हा नृसिंहसरस्वतींनी पुजाऱ्यांना दृष्टांत देऊन सर्व हकिकत कथन केली. त्यानंतर ‘नारायण स्वामी’ हे महापुरूष असल्याची साक्ष पटली व पुजारी मंडळी स्वामींना वंदनीय मानू लागली.
नारायण स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली. कोल्हापूरचे छत्रपती त्यांना मानीत असत. पुष्पकारूढ होऊन वैकुंठगमन केल्यानंतर त्यांनी आपले परम शिष्य श्री कृष्णानंद स्वामींना आपल्या पादुका स्थापून,त्यांचे नित्य अर्चन करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे दत्तगुरूंच्या पश्चिम भागी व श्री उत्सवमूर्तीच्या उजव्या बाजूस नारायण स्वामींच्या सुंदर अशा पादुका स्थापन केल्या. म्हणून उत्सवमूर्तीच्या सान्निध्यात त्यांना अक्षय असे ध्रुवपद दिले.आजही नित्य प्रात:काळी श्री दत्तगुरूंच्या पूजेच्या आधी श्रीमन् नारायण स्वामींची पूजा करतात.हे स्थान अतिशय जागृत व कडक आहे. त्यांचे वास्तव्य वाडीत शाश्वत आहे,असे अनुभूतीतून सिद्ध होते.
अग्रपूजाधिकारी श्रीमद् नारायण स्वामींच्यासारख्या अवतारी पुरुषांच्या कृपाशीर्वादाने नरसोबावाडीतील मंडळी त्यांची सेवा करीत आहेत. अशीच सेवा वंशोवंशी आमच्याकडून करून घेऊन निरंतर कल्याण करावे अशी सर्व पुजारी मंडळींची श्रीमद् नारायण स्वामींच्या पवित्र चरणी प्रार्थना असते!
श्रीमन् नारायण स्वामिन् । दयाब्धे तारकपद दायिन ।
‘ईश्वरप्रणिधानाद्वा’ या भगवान् पतंजलीच्या वचनाला सत्य करण्यासाठी भगवान् दत्तात्रेयांनी त्यांच्यावर अनुग्रह केला व त्यांना समाधिसिद्धी प्राप्त झाली. निरंतर ईश्वरचिंतन केल्याने ईश्वर संतुष्ट होतो व त्याच्या अनुग्रहाने समाधी सिद्धी होते. याप्रमाणे नित्य श्रीनारायणस्वामींचा समाधिअभ्यास चालला असता एके दिवशी पहाटे श्रीनारायणस्वामी नित्याप्रमाणे समाधी लावून बसले.त्यादिवशी मुलींना रोजच्या वेळेच्या पूर्वी जाग आली व शौचाला जाण्याकरता मुली वडिलांना हाका मारू लागल्या.श्रीनारायणस्वामींचा समाधिभंग होईल म्हणून श्रीदत्तांनी श्रीनारायणस्वामींचे रूप घेऊन,मुलींना बाहेर नेऊन त्यांचा विधी उरकून, त्यांना अंथरूणावर झोपवून, श्रीनारायणस्वामी समाधीतून उठण्यापूर्वी श्रीदत्तात्रेय अदृश्य झाले.
नारायण स्वामींचे एक भक्त कुरुंदवाडचे चिवटे यांचेकडे पैशाची वानवा होती. त्यांनी स्वामींना तशी प्रार्थना केली. नारायणस्वामी म्हणाले "उद्या सांबाच्या मागे जे असेल ते घेऊन जा"त्यानुसार सांबाच्या मंदिरामागे पहिले असता. एक जडजवाहीर लादलेला उंट होता. ती संपत्ती घेऊन ते धनवान झाले. काशीहून स्वामींनी आणलेले,त्यांचा नित्य पूजेतील हे लिलाविश्वभर लिंग स्वामींचे आज्ञेनुसार श्री पेटकर स्वामींनी कोल्हापूरच्या मठात स्थापन केले आहे. पण पुढे ते लिंग नृसिह वाडीस दत्तास्थनी देण्यात आले.
श्री.नारायण स्वामींचे वंशज सांगली, मिरज, तासगाव, ब्रम्हनाळ या परिसरात विसापुरकार जोशी या नावाने आहेत. नारायणस्वामींचे वंशज दिक्षिक्त हे वाडीत नारायणस्वामी उत्सवास येत असतात.एकेकाळी नारायणस्वामी स्थानाचे मोठे ऐश्वर्य होते.दत्त संप्रदायातील वासुदेवानंद सरस्वती,चिदंबर दीक्षित महास्वामी,श्री मिरासाहेब,श्री गुळवणी महाराज यांच्या सारख्या सत्पुरूष व्यक्तींना ते पूजनिय होते.नरसोबा वाडीत स्वामींचे अग्रस्थान आहे.स्वामींच्या पवित्र आसनांची पुजारी प्रथम पूजन करतात व नंतर मूळ दत्तस्थान उघडून काकडारती होते.असा त्यांचा सन्मान आहे.श्री नृसिंह सरस्वतीची उत्सव मूर्ती ही कायम नारायण स्वामींचे सानिध्यात असते.केवढा हा सन्मान एक शिष्योत्तमाचा !
आज श्रीनृसिंहवाडी येथे श्री नारायणस्वामींचा आराधना उत्सव संपन्न होत असतो.भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे त्यांच्यावर इतके प्रेम होते की,आजही श्री मनोहर पादुकांच्या पूजेपूर्वी प.पू.श्री.नारायणस्वामींची पूजा होत असते.तसेच देवांची स्वारी (उत्सवमूर्ती) देखील एरवी प.पू. श्री.नारायणस्वामींच्याच ओवरीत विराजमान असते.देवांनाही आपल्या या अनन्य भक्ताचा विरह क्षणभर देखील सहन होत नसावा.