कोल्हापूर, दि. ०१: प्रत्येकाच्या घरापासून जागतिक स्तरावर वाढलेल्या प्लास्टिकच्या अतिवापरामुळे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी येणाऱ्या शंभर दिवसात कोल्हापुरातून प्लास्टिक मुक्तीचे आदर्श मॉडेल तयार करूया असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच पर्यावरण तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्लास्टिक बंदी अभियान राबविण्यासाठी नियोजन आणि विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणावर परिणाम करीत आज मनुष्याच्या शरीरातही मायक्रोप्लास्टिक आढळून येत आहे. अनेक सार्वजनिक पाण्याचे स्रोत, नद्या, नाले, जमीन प्लास्टिकमुळे प्रदूषित झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून २५ ऑगस्ट ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत १०० दिवस प्लॅस्टिक मुक्ती अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत ‘१०० दिवसात प्लास्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर’ या टॅग लाईनचा प्रचार, प्रसार करण्यात येणार असून या प्लास्टिक बंदी अभियानाचा शुभारंभ नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती ताराराणी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, पर्यावरण तज्ज्ञ, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, प्लास्टिक बंदी प्रभावीपणे लागू करून पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम दूर होऊ शकतात. प्लास्टिक हे बायोडिग्रेडेबल नसल्यामुळे जमीन, नद्या, समुद्र आणि हवेत प्रदूषण वाढवते. मायक्रोप्लास्टिक्स अन्नसाखळीत प्रवेश करून मानवी आरोग्यालाही धोका निर्माण करतात, ज्यामुळे जैवविविधता कमी होते आणि पर्यावरणीय संतुलन बिघडते.कोल्हापूर जिल्ह्यात प्लास्टिक बंदी अभियान ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, क्रीडा संस्था, माध्यमे, मंदिरे, उद्योजक, व्यापरी, हॉटेल, फेरीवाले, विविध संस्था, संघटना, विविध गट, बचतगट, केटरींग, व्यावसायिक, फेरीवाले संघटना, एमआयडीसी, किरकोळ फळ-फुले-भाजीपाला विक्रेते आदींच्या सहभागातून राबवण्यात येणार आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आता एक्शन मोडवर या उपक्रमात सहभागी होतील. प्लास्टिक मुक्त कुटुंब अभियान शाळेतून सुरू होणार. प्रत्येक संस्था, पर्यावरण प्रेमी यांनी दिलेल्या सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ग्रामीण भागात प्लास्टिकचा वापर वाढलेला असून प्लास्टिक बंदी साठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले. आपल्या व आपल्या पुढील पिढी साठी या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. कोल्हापूरकर नेहमीच आपल्या कामातून इतरांना प्रेरणा देतात असेही ते म्हणाले. बैठकीच्या शेवटी प्लास्टिक बंदीची शपथ उपस्थितांनी घेतली. स्टील बँक सुरु केल्याबद्दल विदुला स्वामी यांचे कौतुक जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
उत्पादनावर बंदी, ग्राहकांच्या प्लास्टिक वापरावरही निर्बंध, दंडात्मक कारवाईची मागणी-
उपस्थित मान्यवरांनी यावेळी विविध विषयांतून प्लास्टिक बंदी साठी सूचना दिल्या. यात संजय शेट्टे, राहुल मगदूम, विदुला स्वामी, दिलीप पोवार, उदय गायकवाड, संजीव चिपळूणकर, आदिनी विविध सूचना मांडल्या. प्लास्टिक बंदीला पर्याय म्हणून बायोडिग्रेडेबल सामग्रीचा वापर, पुनर्वापराला प्रोत्साहन आणि जनजागृती मोहिमा यामुळे हे परिणाम कमी करता येऊ शकतात. प्रशासन, पर्यावरण प्रेमी, उद्योग आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. जिल्ह्यात ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विक्रेत्यांसह आता प्लास्टिक पिशवी घेणारा ग्राहकही कारवाईच्या कक्षेत यावा व त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच इचलकरंजी येथील कापड उद्योगांनी कापडी पिशव्यांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन प्लास्टिक बंदी उपक्रमात सहभागी व्हावे.
कापडी पिशवी ‘अपमान’ नाही तर ‘अभिमान’-
ज्याप्रमाणे चहासाठी प्लास्टिक कपांचा वापर बंद झाला आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही आता प्लास्टिक पिशवी बंद करण्यासाठी १०० टक्के नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. प्लास्टिक कपातून चहा पिल्याने आरोग्यास धोका आहे ही बाब प्रत्येकाला पटली. तशीच परिस्थिती प्लास्टिक पिशवीसाठी देखील घडावी. यासाठी प्रत्येकाने सोबत तसेच खिशात, गाडीच्या डिक्कीत कापडी पिशवी ठेवावी अशी सूचना करण्यात आली. कापडी पिशवी सोबत असणे कमीपणाचे लक्षण नाही, तो अपमान नाही तर तो सन्मान आणि अभिमान वाटवा. या एका लहान बाबीमुळे प्लास्टिकचा वापर निम्म्यापर्यत कमी होईल. याच बरोबर आपल्या वाहनातील प्लास्टिक बाटल्यांची जागा स्टील बॉटलने घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात दोन शब्द प्लास्टिक मुक्तीसाठी-
शासकीय तसेच खाजगी सार्वजनिक कार्यक्रमात यापुढे प्लास्टिक वापराच्या विरोधात जनजागृतीसाठी दोन शब्द बोलण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. विषय कोणताही असेल मात्र शेवटी किंवा सुरुवातीला लोकांना प्लास्टिक मुक्तीसाठी कार्यक्रमात मार्गदर्शन करावे असे त्यांनी जिल्हावासियांना आवाहन केले.