कोल्हापूरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात,उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे,ए.राजा,निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर,हिंदू धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी "हेट स्पीचचा" गुन्हा नोंदवा यासाठी 50 हिंदूंच्या तक्रारी दाखल..!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सनातन धर्माची तुलना डेंग्यू,मलेरिया,कोरोना,एड्स,कुष्ठरोग आदी रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन,कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे,तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए.राजा,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड,तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा) गुन्हा नोंदवा,अशा ५० तक्रारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात 4 नोव्हेंबर या दिवशी देण्यात आल्या. या तक्रारी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी स्वीकारल्या. या तक्रारी वरिष्ठ स्तरावर पाठवून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल,असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.या अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात राजवाडा पोलीस ठाणे हुपरी पोलीस ठाणे आणि जयसिंगपूर शहर अशा 3 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

तक्रारी दाखल करणार्‍यांमध्ये प्रामुख्याने बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री. प्रथमेश मोरे आणि श्री. विक्रांत कोकाटे,शिवशाही फाऊंडेशनचे श्री.सुनील सामंत,हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री.मनोहर सोरप, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री.दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री.गजानन तोडकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव आणि लग्मण्णा नाईक,अखिल भारत हिंदू महासभेचे श्री.संदीप सासणे,धर्मप्रेमी श्री.रामभाऊ मेथे यांसह ५० जणांचा समावेश आहे. 

या तक्रारीत म्हटले आहे की,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ‘सनातन धर्म,म्हणजे देशाला लागलेली कीड आहे’,असे वक्तव्य केले आहे.कोणत्याही धर्माविषयी अशोभनीय,निंदा करणारे,अपमानास्पद वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावणे हा भा.दं. संहिता कलम 153 (अ), 153 (ब), 295 (अ), 298, 505 आणि आय.टी. कायदा यांतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्यांना त्वरित अटक करण्यात यावी.

उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेले द्वेषपूर्ण वक्तव्य !

चेन्नई येथील कामराज मैदानात भारतीय मुक्ती संग्रामातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान’ या विषयावरील व्यंगचित्रांच्या पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘काही गोष्टींना नुसता विरोध करून जमणार नाही,तर त्यांचा समूळ नायनाट केला पाहिजे. डेंग्यूचे डास,मलेरिया, कोरोना, ताप यांसारख्या गोष्टींना केवळ विरोध करून जमत नाही.त्यांना नष्ट केले पाहिजे.त्याप्रमाणे सनातन (धर्म) सुद्धा नष्ट केला गेला पाहिजे.

‘हेट स्पीच’विषयी सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती के.एम्. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना यांनी 28 एप्रिल या दिवशी ‘समाजात कुणीही द्वेष पसरवणारे वक्तव्य करून समाजात वाद निर्माण करणार्यांच्या विरोधात कुणी तक्रार प्रविष्ट करण्याची वाट न पहाता सरकारने स्वत:च गुन्हा नोंदवावा’,असे निर्देश दिले आहेत.असे करण्यास विलंब झाला,तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानला जाईल,असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.असे असूनही सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण भाषण करणार्यांच्या विरोधात अद्यापही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top