आरोग्य भाग- 34
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात.हृदयाचा ताल बिघडू शकतो.किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात.तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते.परंतु हृदयाच्या स्रायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळं त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार असं सर्वसाधारण रीत्या म्हटलं जातं.आपण बराच काळ सतत वेगानं चालत असलो की पाय दुखु लागतात किंवा जड वजन उचलल्यामुळं हात दुखु लागतात.याचं कारण म्हणजे पायांच्या किंवा हाताच्या स्नायूंना काम करण्यासाठी ज्या वेगानं ऑक्सिजनचा वापर करावा लागतो त्या वेगानं त्यांना तो मिळत नाही.
हृदय हाही एक स्रायूच असल्यामुळे त्यालाही जर योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा झाला नाही तर तोही दुखू लागतो. जस तेल वाहून नेणार्या टँकरच्या इंजिनाला त्या टैंकरमधल्या तेलाचा काहीच उपयोग होत नाही तसंच हृदयाच्या आत कितीही रक्त असलं तरी त्याचा वापर त्या स्नायूंना करता येत नाही.त्यासाठी त्याच्यावर एखाद्या मुकुटाप्रमाणे विराजमान झालेल्या रक्तवाहिन्यांकडून त्याला रक्ताचा योग्य तितका पुरवठा व्हावा लागतो.जर काही कारणानं या वाहिन्या चोंदल्या तर त्यांच्या मधून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात.त्यामुळे मग त्या वाहिन्या हृदयाच्या स्नायूला योग्य तितकं रक्त पुरवू शकत नाहीत.या वाहिन्या चोंदण्याची अनेक कारणं आहेत.ज्यांच्या शरीरात ही कारणं निर्माण होण्याची शक्यता जास्ती आहे अशांना मग हृदयविकार होण्याची शक्यताही वाढीस लागते.
ज्यांना उच्च रक्तदाबाचा विकार जडलेला आहे त्यांना हृदयविकारही जडण्याची शक्यता जास्ती असते.रक्तदाब वाढण्याचीही अनेक कारणं आहेत.अतिधुम्रपान,लठ्ठपणा तसंच शरीराची फारशी हालचाल न करणं यामुळं रक्तदाब वाढीस लागतो.काहींच्या आनुवंशिक गुणधर्मामुळे रक्तदाब वाढलेला असतो.तसंच अतितणावग्रस्त परिस्थितीही रक्तदाब वाढण्यास कारणीभूत होते.पण त्याहूनही अधिक घोकादायक आहे ते रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण हे वाढलेलं असेल तर मग हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्या कोंडण्याची शक्यताही वाढीस लागते.मांसजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे तसंच संपृक्त म्हणजेच सॅच्युरेटेड चरबी सेवनही याला कारणीभूत असतं. आपल्या जेवणात तळणासाठी सॅच्युरेटेड फैट्स ज्याच्यात कमी प्रमाणात आहेत अशा सूर्यफूल,करडई यासारख्या तेलांचा वापर केल्यास कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाला काही प्रमाणात आळा घालता येतो.
मधुमेह असणाऱ्या मंडळींनाही हृदयविकार होण्याची शक्यता जास्ती असते. तसंच लठ्ठपणा,मेदवृद्धी हीही हृदयविकाराला पोषक परिस्थिती निर्माण करतात.बॉडी मास इंडेक्स म्हणजेच वजन आणि उंची यांचं गुणोत्तर हे लठ्ठपणा मोजण्याचं एक एकक आहे.ज्यांचा बॉडी मास इंडेक्स पेक्षा जास्ती आहे अशांना हृदयविकार होण्याची शक्यताही जास्ती असते.अति धूम्रपान किंवा अति मद्यपान हेही हृदयविकाराला कारणीभूत असतात.
सदरहू लेख डॉ.बाळ फोंडके यांच्या कोण.? या पुस्तकातून, आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे श्री सावंतसर यांनी संपादन करून,आमचेकडे जनहितार्थ प्रसिद्ध करण्यास दिला आहे.