*सांगलीत आज, सांगली बस स्टॅन्ड ते अंकली या रोडच्या विविध मागण्यांसाठी ,सर्वपक्षीय कृती समितीच्या व नागरिकांच्या वतीने आकाशवाणी केंद्राच्या चौकात रस्ता रोको--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगली बस स्थानक ते अंकलीपर्यंत गेल्या काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणात अपघातांची एक मालिकाच सुरू आहे. त्यामध्ये बऱ्याच निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे ,त्याबरोबरच काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व सुद्धा आलेले आहे .सदरचा रस्ता हा नेहमीच्या वरदळीचा असून ,या रस्त्यावर फळ मार्केट ,हॉटेल्स ,चार चाकी वाहनांची शोरूम्स, भंगार बाजार, काही शाळा, महाविद्यालयांना जोडणारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस सांगली ते अंकलीपर्यंत, मोठ्या प्रमाणावर नागरिक वसाहती झाल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर जाणार- येणार्यांची नेहमीच वर्दळ असते. गेल्या काही वर्षांमध्ये या रस्त्याचा कोणताच विकास झालेला नसून, फक्त या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूमी संपादन झालेले आहे व त्याचा मोबदला संबंधित मालकानाही दिलेला आहे असे माहितीनुसार समजते .सदर रस्त्याच्या रुंदीकरणाबाबतीतही कोणतेही काम झालेले नाही .या रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी काही उपाययोजना करणेबाबत सर्वपक्षीय कृती समितीने माननीय सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांचेकडे काही मागण्या केल्या होत्या. अद्यापही या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने व नागरिकांच्या वतीने आज आकाशवाणी केंद्र नजीक चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सर्वपक्षीय कृती समितीने केलेल्या मागण्या खालील प्रमाणे आहेत
१)जकात नाका ते सांगली बस स्थानकापर्यंत अंधार असल्यामुळे स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे.
२)रस्त्यावर ठिकाणी वर्दळ आहे अशा ठिकाणी गतिरोधक व रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे मारणे.
३)रस्त्याच्या दोन्ही बाजूस खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे ,भविष्यात होणारे अतिक्रमण उपाययोजना करणे.
४)या रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी, दिशादर्शक फलक व वेगांची मर्यादेचे फलक स्पष्ट लावण्यात यावेत.
सदरहू रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी वरील मागण्यांच्या बाबतीत ताबडतोब उपाय योजना करण्यासाठी व कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून हा रस्ता पूर्ण क्षमतेने होण्यासाठी ,आजचा रस्ता रोको आंदोलन ,सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने व नागरिकांच्या वतीने करण्यात आले. आजच्या झालेल्या रस्ता रोको मध्ये, सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.