कोल्हापूर, दि. 1 (प्रतिनिधी): महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या लोकशाही दिनात एकूण 81 अर्ज दाखल झाले, यापैकी 22 अर्ज महसूल विभाग, 9 कोल्हापूर महानगरपालिका, पोलीस विभाग- 5, जिल्हा परिषदेचे 12 तर 33 इतर विभागांचे होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला लोकशाही दिनात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले.
लोकशाही दिनी प्राप्त अर्जांवर त्याच दिवशी कार्यवाहीला सुरुवात झाली. प्रत्येक विभागाला आलेल्या अर्जांच्या प्रती तात्काळ देण्यात आल्या. यावेळी उपस्थित विभागप्रमुखांना कामकाजासंदर्भात सूचनाही दिल्या. पुढील लोकशाही दिनापूर्वी, म्हणजेच एका महिन्याच्या आत, संबंधित अर्जदारांना अनुपालन अहवाल द्यावा. अर्जदारांना वारंवार लोकशाही दिनात अर्ज देण्याची आवश्यकता पडू देऊ नका. प्रत्येक अनुपालन विभागप्रमुखांनी पडताळून गुणवत्तापूर्ण देण्याविषयी सूचना यावेळी दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी मुद्रांक बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा अधिक्षक भूमिअभिलेख शिवाजीराव भोसले, तहसिलदार करमणूक तेजस्विनी पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख आणि अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.