जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्रातील भक्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथे, शंभू महादेव यात्रेच्या आजच्या मुख्य दिवशी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भक्त भाविक गडावर आले आहेत. शिखर शिंगणापूर येथील यात्रेचा आजचा मुख्य दिवस असल्याने, भक्त भाविकांचा," हर हर महादेव, हर हर महादेव" चा जयघोष जिकडे पहावे तिकडे पहावयास मिळत आहे. राज्यातील भक्त भावीक, हजारोंच्या संख्येने कावडी घेऊन गडावर हजर झाले आहेत .
शिखर शिंगणापूर या नावाने प्रचलित असलेल्या डोंगरावर, शंकराची पत्नी असलेल्या पार्वती यांचा पुनर्विवाह गडावर झाल्याची माहिती सर्वश्रुत आहे. हजारोंच्या संख्येने भक्त भावीक, "हर हर महादेव"च्या जयघोषात ,कावडी गड्याच्या पायथ्यापासून, मुंगी घाटातून डोंगरावर पोहोचतात हे दृश्य, एकंदरीतच अवर्णनीय व अंगावर रोमांच उभे करणारे आहे. या सर्व कावडींमध्ये महत्त्वाची समजली जाणारी तेल्या भुत्याची कावड ही होय. भक्त भाविकांनी गडावर आणलेल्या कावडी या मंदिराच्या दरवाज्याला लावून, त्यातील पाणी शिवपार्वतीच्या लिंगावर वाहिले जाते ,शिवाय दोन लिंग असलेले हे राज्यातील एकमेव मंदिर होय. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेली यात्रा ही पौर्णिमेपर्यंत चालत असून, महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील लाखो भक्त भाविकांचे श्रद्धास्थान असून, दरवर्षी शिखर शिंगणापूर येथे भक्त भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या मंदिरात विविध कार्यक्रम चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत साजरे होऊन, चैत्र शुद्ध पंचमीला देवांना हळद लावली जाते व चैत्रशुद्ध अष्टमीला शिवपार्वतीचा विवाह सोहळा पार पडतो.
शिखर शिंगणापूर येथील शिवालय मंदिर हे अतिशय मजबूत तटबंदीसह बांधण्यात आले असून, अति प्राचीन हेमाडपंथी आहे. मुख्य शिवपार्वती मंदिरासमोर चार मोठे दीपस्तंभ असून, गडाच्या पायथ्यापासून भक्त भाविकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. गडाच्या पायथ्यापासून पायऱ्यांवर ठराविक अंतरावर कमानी ,शिवाय पहिला दरवाजा हा जवळपास 16 मीटरचा असून शेंडगे दरवाजा म्हणून प्रसिद्ध आहे व मुख्य दरवाज्यास जिजाऊ दरवाजा असे संबोधले जाते. दरवाज्याच्या एका बाजूला श्री. गजाननाची व दुसऱ्या बाजूला हनुमंतरायाची मूर्ती असून, सदरहू दरवाज्याचे काम पूर्वीच्या काळी शहाजीराजांनी केले होते.